१५वर्षीय वैभव सूर्यवंशीने काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये टी२० पदार्पण केलं. भारतासाठी खेळणारा तो सगळ्यात लहान वयाचा पदार्पणवीर ठरला. बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी संघात त्याची निवड केली. बंगळुरूत सध्या सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या लढतीत १५वर्षीय वैभव, फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये १००हून अधिक सामने खेळणाऱ्या अनुभवी खेळाडूंचं नेतृत्व करत आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत, इशान किशन हा पूर्व विभागाचा कर्णधार आहे. मात्र यष्टीरक्षणादरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडे नेतृत्वाची धुरा आली. मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर आयन जुयालने फटका खेळला. यष्टीरक्षक कुमार कुशाग्र आणि मुकेश कुमार यांनी अपील केलं मात्र फलंदाज बाद आहे का याबाबत ते साशंक होते. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या वैभवला खात्री होती. त्याने ३ सेकंद बाकी असताना रिव्ह्यूचा निर्णय घेतला. वैभवचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं. रिप्लेत आयनच्या बॅटची कड घेऊन चेंडू कुशाग्रच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावल्याचं स्पष्ट झालं. तिसऱ्या पंचांनी कौल देताच वैभवने जोरदार जल्लोष केला. वैभवच्या बरोबरीने पूर्व विभागाच्या खेळाडूंनी आनंद साजरा केला.

पूर्व विभागाचा संघ जाहीर झाला तेव्हा वैभवची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. या निवडीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण शालेय वयातल्या खेळाडूकडे इतक्या मोठ्या जबाबदारीचं पद देण्यावरून अनेकांनी निरनिराळं म्हणणं मांडलं. नियमित कर्णधार इशान दुखापतग्रस्त झाल्याने वैभवने संघाचं नेतृत्व केलं. वैभवच्या संघातील मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार हे भारतासाठी खेळले आहेत. ३५वर्षीय शमीने ६४ कसोटी, १०८ एकदिवसीय आणि २५ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या नावावर ४५०हून अधिक विकेट्स आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शमीने ९८ सामन्यात ३७७ विकेट्स घेतल्या आहेत. डोमेस्टिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेला शमी वैभवच्या नेतृत्वात खेळला.

३२ वर्षीय मुकेश कुमारने ३ कसोटी, ६ एकदिवसीय आणि १७ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये ५८ सामन्यात त्याच्या नावावर २२३ विकेट्स आहेत. या दोघांच्या बरोबरीने पूर्व विभाग संघात अभिमन्यू इश्वरनसारखा अनुभवी फलंदाज आहे. ३०वर्षीय अभिमन्यू भारतासाठी पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर होता. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे धावांची टांकसाळ उघडणाऱ्या अभिमन्यूच्या नावावर ११४ सामन्यात ८३९६ धावा आहेत. यामध्ये २७ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. बंगाल संघाचा आधारवड असलेला अभिमन्यू सातत्याने इंडिया अ संघाचा भाग असतो. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दशकभराहून अधिक काळ अभिमन्यू खेळतो आहे. मात्र त्याला बाजूला सारून वैभवकडे उपकर्णधारपद देण्यात आलं.

मधल्या फळीत खेळणारे कुमार कुशाग्र, सुदीप कुमार घरामी, विराट सिंग हे तिघेही वैभवपेक्षा वयाने बऱ्यापैकी मोठे आहेत. फिरकीपटू अष्टपैलू अनुकूल रॉय याच्याकडेही डोमेस्टिक क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. तो गेली ७ वर्ष आयपीएलही खेळतो आहे. मोहम्मद कनैन कुरेशी आणि अभिजीत सरकार हे दोघेही वैभवपेक्षा वयाने मोठे आहेत. मुद्दा फक्त वयाचा नसून, या सगळ्यांकडे डोमेस्टिक क्रिकेटचा मोठा अनुभव आहे.

पूर्व विभाग खेळाडूंची वयं

मोहम्मद शमी (३५)
मुकेश कुमार (३२)
अभिमन्यू इश्वरन (३०)
अभिजीत सरकार (२९)
विराट सिंग (२८)
इशान किशन (२८)
सुदीप कुमार घरामी (२७)
अनुकूल रॉय (२७)
मोहम्मद कनैन कुरेशी (२३)
कुमार कुशाग्र (२१)
वैभव सूर्यवंशी (१५)