Vaibhav Sooryavanshi 25 Balls Hundred Video: वैभव सूर्यवंशी म्हणजे षटकारांची आतिषबाजी हे निश्चित! आता वैभवने अवघ्या २५ चेंडूत शतक झळकावत सर्वांचं पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. वैभव सूर्यवंशीचा संघ राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६च्या प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. अखेरच्या गट सामन्यात राजस्थानने मुंबईचा पराभव करत प्लेऑफ गाठलं. आता संघाचा एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध होणार आहे. यापूर्वी वैभवच्या या वादळी शतकी खेळीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनचा युट्युब व्हीडिओ सध्या गाजतोय. केविन पीटरसनने ‘द स्विच’ या त्याच्या यूट्यूब चॅनलवर २५ मे रोजी वैभव सूर्यवंशीचा समावेश असलेला एक एपिसोड अपलोड केला आणि त्याला लगेचच प्रचंड लाईक्स मिळाले. या एपिसोडमध्ये केविन पीटरसनने त्याला ५० चेंडूंमध्ये शतक करण्याचं आव्हान दिलं होतं, परंतु वैभव सूर्यवंशीने हे आव्हान केवळ २५ चेंडूंमध्येच पूर्ण केलं.

वैभव सूर्यवंशी या व्हीडिओमध्ये फलंदाजी करत आहे. तर समोर ध्रुव जुरेल बॉलिंग मशीनवरून गोलंदाजी करत आहे. बॉलिंग मशीनमधील जवळपास येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर वैभव मोठा फटका खेळू पाहत होता. या बॉलिंग मशीनमधून येणाऱ्या प्रत्येक चेंडूचा वेग मात्र वेगळा होता. ५० किमीप्रति तास ते १०० किमी प्रति तासच्या वेगाचे हे चेंडू होते. त्याने अवघ्या ११ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान मैदानावर अनेक फिल्डर होते, पण वैभवने खेळलेल्या चेंडूचा झेल मात्र कोणी टिपू शकले नाहीत. यासह वैभवने २५ चेंडूच आपलं शतक पूर्ण केलं. पण श्रेयस अय्यरचा विक्रम मात्र तो मोडू शकला नाही.

वैभव सूर्यवंशीचं २५ चेंडूत शतकाचा व्हीडिओ पाहिलात का?

वैभव सूर्यवंशीने षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या २५ चेंडूंमध्ये १४ षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. मात्र, केविन पीटरसनच्या शोमधील सर्वात जलद शतकाचा श्रेयस अय्यरचा विक्रम तो मोडू शकला नाही. श्रेयस अय्यरने केविन पीटरसनच्या शोमध्ये अवघ्या २२ चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. याचा अर्थ, वैभव सूर्यवंशीने श्रेयस अय्यरचा विक्रम तीन चेंडूंनी मोडण्याची संधी गमावली. मात्र, जेव्हा केविन पीटरसनने त्याला शोमध्ये विचारले, तेव्हा त्याने अय्यरचा विक्रम मोडणार असल्याचे सांगितले होते, पण तसं घडलं नाही.

पीटरसनच्या शोमध्ये सर्वात जलद शतकं करणाऱ्यांच्या यादीत वैभव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन आहे, ज्याने २८ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. एबी डिव्हिलियर्सने ३० चेंडूंमध्ये, तर यशस्वी जैस्वालने आपले शतक पूर्ण करण्यासाठी ४७ चेंडू घेतले.

वैभव सूर्यवंशीच्या खेळीदरम्यान, केविन पीटरसनने त्याला काही प्रश्न विचारले, ज्यांची त्याने उत्तरं दिली. पीटरसनने वैभवला विचारलं, त्याला काय जास्त आवडतं, प्रथम फलंदाजी की धावांचा पाठलाग करणं. वैभवने उत्तर दिलं, “दोन्ही.” त्यानंतर पीटरसनने त्याला विचारलं, “जेव्हा तू ९० धावांच्या आसपास खेळत असतोस, तेव्हा मनात काय विचार येतात?” वैभवने उत्तर दिलं, “मी फक्त माझा नैसर्गिक खेळ खेळण्यावर लक्ष केंद्रित करतो. “पीटरसनने वैभव सूर्यवंशीला त्याची सर्वात मोठी खेळी कधी खेळली, असंही विचारलं. त्यावर वैभव म्हणाला की, एका देशांतर्गत सामन्यात त्याने एकट्याने ५० षटकं फलंदाजी करून ३५३ धावा केल्या होत्या.