Vaibhav Sooryavanshi 200 strike rate: भारत अ आणि अफगाणिस्तान अ संघांमध्ये तिरंगी मालिकेतील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारत अ संघाला वैभव सूर्यवंशीने दणक्यात डावाची सुरूवात करून दिली, ज्यासाठी तो जगभरात ओळखला जातो. त्याने चौकाराने आपल्या फलंदाजीचा श्रीगणेशा केला. वैभव चौकारांचा पाऊस पाडत ४४ धावा करत बाद झाला, पण त्याचं अर्धशतक हुकलं. त्याने प्रभसिमरन सिंगच्या जोडीने आपल्या वादळी फटकेबाजीसह संघाला चांगली सुरूवात करून दिली.

वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त ‘ग्राउंड शॉट’ खेळत आणखी एक चौकार लगावला. अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्धच्या सुरुवातीच्या षटकात सूर्यवंशीने तीन चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकारांसह एकूण ९ धावा केल्या. श्रीलंकेत सध्या एकदिवसीय (ODI) स्वरूपाची तिरंगी मालिका सुरू आहे. यामधील अफगाणिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात वैभवने छोटी खेळी केली असली, तरी त्यादरम्यान त्याने आक्रमक फलंदाजी केली.

श्रीलंका संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैभवला फार धावा करता आल्या नाहीत; १२ चेंडूंमध्ये केवळ १४ धावा करून तो बाद झाला. त्यानंतर आज गुरुवारी भारत आणि अफगाणिस्तानचे ‘अ’ संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात वैभवने एकही मोठा फटका मारला नाही; त्याऐवजी त्याने समंजसपणे फलंदाजी केली. अर्धशतकाजवळ पोहोचलेला असतानाच तो बाद झाला. वैभवने २२ चेंडूंत ४४ धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट नेमका २०० राहिला.

आपल्या खेळीदरम्यान त्याने नऊ चौकार मारले, पण त्याला षटकार मारता आला नाही. अब्दुल्ला अहमदझाईच्या चेंडूवर तो बाद झाला. वैभव बाद झाला तोपर्यंत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली होती; तो बाद झाला तेव्हा ‘भारत ए’ संघाची धावसंख्या ७४ धावा होती. दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या प्रभसिमरन सिंगनेही त्याला चांगली साथ दिली.

वैभव सूर्यवंशीने प्रभसिमरन सिंगच्या साथीने पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. सूर्यवंशी बाद झाल्यामुळे ही भागीदारी संपुष्टात आली; तो अर्धशतकापासून अवघ्या सहा धावा दूर असताना बाद झाला. त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने २२ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या, ज्यामध्ये नऊ चौकारांचा समावेश होता.