Vaibhav Sooryavanshi Angry on RR Management: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीवर सध्या सर्वांच्या नदरा आहेत. वैभवने आपल्या फटकेबाजीने असा धमाका केला आहे की, सर्वजण चकित झाले आहेत. मात्र, सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सूर्यवंशीची बॅट तळपली नाही. पदार्पणवीर प्रफुल हिंगेने गोल्डन डकवर त्याला झेलबाद करत माघारी धाडलं. सामन्यानंतर, व्यवस्थापनाच्या एका निर्णयामुळे वैभव सूर्यवंशी नाराज असल्याचं प्रशिक्षकांनी उघड केलं.

पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर प्रफुल हिंगेने वैभवला बाद केलं. हा युवा डावखुरा फलंदाज शून्यावर झेलबाद झाला. यानंतर प्रफुलने पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेतले आणि राजस्थानला पुनरागमनाचीस संधी नाही दिली. परिणामी, राजस्थानला या हंगामातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

राजस्थानचा कर्णधार रियान परागने हैदराबादविरूद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली, तेव्हा संघात वैभवचं नाव नव्हतं. तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सामन्यात खेळणार होता, पण तो या निर्णयामुळे नाराज होता. सहाय्यक प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी म्हणाले की, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड झाल्यामुळे वैभव नाराज होता.

पेनी म्हणाले, “तो मागच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत नव्हता. तो यामुळे नाराज होता, कारण त्याला क्षेत्ररक्षणही करायला आवडतं. त्याला इम्पॅक्ट प्लेअऱ म्हणून खेळवण्याचा अर्थ असा नाही की तो वाईट क्षेत्ररक्षक आहे. डोनोव्हन फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला होता. तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे वैभवला बाहेर बसावं लागलं.”

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने सहा गडी गमावून २१६ धावा केल्या. राजस्थानच्या स्फोटक फलंदाजीमुळे हे लक्ष्य सहज गाठता येईल असं सर्वांना वाटत होतं, पण संघ अवघ्या १५९ धावांवर गारद झाला. हैदराबादकडून या सामन्यात देशांतर्गत क्रिकेटमधील दोन गोलंदाजांना पदार्पणाची संधी दिली. प्रफुल हिंगे व साकिब हुसैन यांनी पदार्पणाच्या सामन्यात एकच धुव्वा उडवला. दोघांनीही ४-४ विकेट्स घेत राजस्थानच्या फलंदाजीला सुरूंग लावला आणि त्याचा विजयरथ रोखला.

प्रफुल हिंगेने पहिल्याच षटकात तीन बळी घेऊन राजस्थानची परिस्थिती आणखी बिकट केली. संघाने अवघ्या नऊ धावांत पाच गडी गमावले. मात्र, फरेरा आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. पण अखेरच्या षटकांमध्ये साकिब हुसैनने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत राजस्थानला सर्वबाद करण्यात मोठी भूमिका बजावली.