Vaibhav Sooryavanshi Answer to Ravi Shastri Question: आयपीएल २०२६ मधील आपल्या स्फोटक कामगिरीने वैभव सूर्यवंशीने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील सर्वच चाहत्यांची मनं जिंकली. २०२६ च्या आयपीएलनंतर त्याला ऑरेंज कॅपसह पाच मोठे पुरस्कार मिळाले. त्याला ‘स्पर्धेतील मौल्यवान खेळाडू’ म्हणूनही गौरविण्यात आलं. अंतिम सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात रवी शास्त्री यांनी वैभवला एक भन्नाट प्रश्न विचारला आणि १५ वर्षीय सूर्यवंशीने त्याचं अप्रतिम उत्तर दिलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वैभव सूर्यवंशी हा ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला. वैभवने स्पर्धेत १६ सामन्यांमध्ये ४८.५० च्या सरासरीने ७७६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक झळकावलं, पण त्याची दोन ऐतिहासिक शतकं मात्र हुकली. याशिवाय त्याने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला मागे टाकत सर्वाधिक षटकारांचा विक्रमही आपल्या नावे केला.

खरं तर, जेव्हा वैभव सूर्यवंशीला इतके पुरस्कार मिळाले, तेव्हा सूत्रसंचालक रवी शास्त्री यांनी त्याला विचारलं, “तुला इतके पुरस्कार मिळाले कसं वाटतंय, यावर वैभव म्हणाला, “खूप छान वाटतंय. पण खरं सांगायचं तर मुलाखतीसाठी इथे आलोय, त्यामुळे थोडंसं दडपणही जाणवत आहे. तरीही हा खूप अभिमानाचा क्षण आहे. मला खूप आनंद होत आहे आणि पुढच्या हंगामात याहूनही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.” यावर रवी शास्त्री म्हणाले, “तुला कोणत्या गोष्टीचं दडपण येत तर…” म्हणत दोघेही हसू लागले.

वैभव सूर्यवंशीचं रवी शास्त्रींच्या प्रश्नावर भन्नाट उत्तर

रवी शास्त्रींनी पुढे विचारलं, तू गोलंदाजांची धुलाई करतोस, एकापेक्षा षटकार मारता, मग तू रोज किती दूध पितोस?” यावर हसत वैभव म्हणतो, सर, सध्या मी दूध पित नाहीये. हे ऐकून स्टेडियममध्ये चाहते एकाच कल्ला करू लागले. पण मी नेहमी माझ्या खेळावर विश्वास ठेवतो. पहिलाच चेंडू माझ्या आवडीच्या क्षेत्रात आला आणि तो मारण्यासारखा वाटला, तर मी पूर्ण आत्मविश्वासाने फटका खेळतो. माझा नैसर्गिक खेळ तसाच आहे आणि मी त्यावर कायम विश्वास ठेवतो.

यंदाच्या हंगामातून काय शिकलास, यावर बोलताना वैभव म्हणाला, “या हंगामात मी दडपणाच्या परिस्थितीत कसं खेळायचं आणि सामन्याच्या गरजेनुसार आपला खेळ कसा बदलायचा, हे शिकलो. प्रत्येक सामना एकाच मानसिकतेने खेळता येत नाही. परिस्थिती ओळखून संघाला जे हवं आहे त्यानुसार खेळावं लागतं. विशेषतः प्ले-ऑफच्या सामन्यांमधून मला याबाबत खूप काही शिकायला मिळालं.”

वैभव फिटनेसबाबत पुढे म्हणाला, “मला फिटनेसवर खूप मेहनत घ्यावी लागेल, कारण मला खूप वर्षे क्रिकेट खेळायचं आहे. दुखापतींपासून दूर राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या काळात फिटनेसवर अधिक लक्ष देणार आहे.”

राजस्थान रॉयल्समधील वातावरण आणि मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल वैभव म्हणाला: “संघातील प्रत्येक जण मला खूप साथ देतो. वरिष्ठ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ माझ्यावर विश्वास दाखवतात. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं, कारण त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल स्तरावर मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आहे. त्यामुळे अशा वातावरणात राहणं आणि शिकणं माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे.”