Vaibhav Sooryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी मैदानावर फटकेबाजीसाठी उतरला आणि विक्रमी खेळी केली नाही असं फार कमी वेळेस झालं आहे. १५ वर्षांच्या या मुलाने आयपीएल २०२६ मध्ये जणू धुमाकूळ घातला आहे. एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी करत आजवर कोणत्याही फलंदाजाने साध्य न केलेले विक्रम तो आपल्या नावे करत आहे. आता त्याने ऋषभ पंतला टाकत टी-२० स्पर्धेत असा विक्रम केला आहे जो जगात कोणालाच जमला नाही.
बॉस बेबी म्हणून ओळख मिळवणाऱ्या अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये एक अशी कामगिरी केली आहे, जी अगदी सर्वात यशस्वी खेळाडूंनाही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरूवातीला करता आलेली नाही. राजस्थान रॉयल्सच्या या युवा खेळाडूने लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात एका आयपीएल हंगामात ५०० धावा पूर्ण करून नवा इतिहास लिहिला. यासह, तो कोणत्याही टी-२० स्पर्धेत ५०० धावा करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीने घडवला इतिहास
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, वैभवला हा विक्रम गाठण्यासाठी केवळ १४ धावांची गरज होती आणि त्याने १४ चेंडूंमध्येच हा टप्पा गाठला. या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने ऋषभ पंतचा विक्रमही मोडला. यापूर्वी, आयपीएलच्या एका हंगामात ५०० धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून ऋषभ पंतच्या नावावर विक्रम होता, जो त्याने २०१८ मध्ये केला होता.
एवढंच नाही तर, वैभव सूर्यवंशी एकाच आयपीएल हंगामात ५० षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाने हा पराक्रम केला नव्हता. त्याने अवघ्या २३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून लखनौच्या गोलंदाजांना हैराण केले. या सामन्यापूर्वी वैभवने आयपीएल २०२६ मध्ये ४३ षटकार मारले होते.
लखनौच्या गोलंदाजांविरुद्ध सात षटकार मारून वैभवने आयपीएल इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं आहे. वैभव ७ चौकार व १० षटकारांसह ९३ धावांवर बाद झाला. यामुळे एकाच आयपीएल हंगामातील त्याच्या षटकारांची एकूण संख्या ५३ झाली आहे. आता वैभव सूर्यवंशीला ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक ५९ षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने राजस्थानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियन फलंदाज मिचेल मार्शच्या ९६ धावांच्या खेळीमुळे लखनौला २० षटकांत २२० धावांचा डोंगर पार करता आला. ज्याच जोश इंग्लिसचं ६० धावांचं योगदान होतं. पण वैभव सूर्यवंशीची ९३ धावांची आणि ध्रुव जुरेलची ५७ धावांची खेळी लखनौला भारी पडली.
