वैभव सूर्यवंशी हे नाव आता आयपीएल २०२६ नंतर सर्वांच्या अगदी परिचयाचं झालं आहे. वैभव सूर्यवंशी म्हणजे स्फोटक फलंदाजी आणि षटकारांचा पाऊस. वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने क्वालिफायर-२ पर्यंत मजल मारली. पण संघ जेतपदापर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र, वैभवने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनत ऑरेंज कॅपवर नाव कोरलं. यादरम्यान अश्विनने त्याच्या चौकारांसंबंधित विक्रमावर मिश्किल टिप्पणी केली, यावर वैभवने प्रतिक्रिया दिली आहे.

तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वैभवने १६ सामन्यांत तब्बल ७७६ धावा करत आयपीएलच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णअक्षरांनी नोंदवलं. त्याच्या स्फोटक खेळींनी क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. टी-२० क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवूनही या डावखुऱ्या फलंदाजाचे लक्ष्य केवळ फ्रँचायझी क्रिकेटपुरते मर्यादित नाही. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सर्वोच्च स्तरावर देशासाठी खेळण्याचे स्वप्न वैभव सूर्यवंशी पाहत आहे.

वैभव सूर्यवंशीने स्पर्धेत पाच पुरस्कार पटकावले. यामध्ये ऑरेंज कॅप, मौल्यवान खेळाडू, सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन, सर्वाधिक षटकार, इमर्जिंग प्लेअर या पुरस्कारांचा समावेश आहे. या हंगामातील सर्वाधिक चौकारांचा पुरस्कार मात्र त्याला मिळाला नाही. माजी अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने मिश्कीलपणे म्हटलं की, यंदा सर्वाधिक चौकार मारण्याचा पुरस्कार सोडला तर बाकी सर्व पुरस्कार वैभव सूर्यवंशीने जिंकले आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना वैभवने मोठा खुलासा केला. तो म्हणाला की, त्याने लाल चेंडूने (रेड-बॉल) सराव सुरू केला असून भविष्यात आपल्या खेळाची नवी बाजू सर्वांना दाखवण्याचा त्याचा मानस आहे. “हो, आता मला मैदानावर उतरून खेळावं लागेल कारण पुढचं आव्हान एकदिवसीय क्रिकेटचं आहे. मी लाल चेंडूने खूप सराव केला आहे. मात्र, लोकांनी मला तसं खेळताना अजून पाहिलेलं नाही. पण लवकरच तेही पाहायला मिळेल,” असे वैभव म्हणाला.

पुढे वैभव म्हणाला, “लोकांना वाटतं की मला प्रत्येक चेंडू मारायचाच असतो. पण हा टी-२० क्रिकेटचा फॉरमॅट आहे आणि प्रशिक्षकांनी मला आक्रमक खेळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. मी फटके मारतो कारण मला माहिती असतं की ते मी मारू शकतो. कोणत्याही दबावामुळे किंवा सक्तीमुळे मी तसे खेळत नाही.”

“मला नक्कीच कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. माझ्या वडिलांनीही मला नेहमी सांगितलं आहे की कसोटी क्रिकेट हाच क्रिकेटचा सर्वोच्च फॉरमॅट आहे. मी याआधीही कसोटी स्वरूपाचं क्रिकेट खेळलो आहे. अजून मला फारसे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. रणजी ट्रॉफीत खेळलो, पण अपेक्षेइतक्या संधी मिळाल्या नाहीत. ते माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. मात्र, माझ्या खेळातील त्या पैलूवर मी सातत्याने मेहनत करत राहणार आहे.”