Vaibhav Sooryavanshi Breaks David Warner Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने अवघ्या २९ चेंडूत ९७ धावांची वादळी खेळी केली. वैभव सूर्यवंशीकडे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. त्याचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. या खेळीदरम्यान त्याने १२ षटकार आणि ५ चौकार खेचले. या खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
वैभव सूर्यवंशीने मोडला डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड
वैभव सूर्यवंशीने या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यादरम्यान त्याने आयपीएल स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यासह त्याने डेव्हिड वॉर्नरचा एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. तो आयपीएलच्या एकाच हंगामात पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नरने आयपीएल २०१६ स्पर्धेत पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना ४६७ धावा केल्या होत्या. तर वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ स्पर्धेत ४९० धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या एका हंगामात पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
वैभव सूर्यवंशी : ४९० धावा (२०२६)
डेव्हिड वॉर्नर: ४६७ धावा (२०१६)
ट्रॅव्हिस हेड: ४०२ धावा (२०२४)
साई सुदर्शन: ४०२ धावा (२०२५)
ॲडम गिलख्रिस्ट: ३८२ धावा (२००९)
एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने ९७ धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकांअखेर ८ गडी बाद २४३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून नितीश कुमार रेड्डीने ३८ धावा केल्या. हैदराबादचा संपूर्ण डाव अवघ्या १९६ धावांवर आटोपला. यासह राजस्थान रॉयल्सने हा सामना ४७ धावांनी आपल्या नावावर केला.
