Vaibhav Sooryavanshi Breaks Sachin Tendulkar Record: झिम्बाब्वे दौऱ्यावर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० ने दमदार विजयाची नोंद केली आहे.या मालिकेतील ३ पैकी २ सामन्यांमध्ये त्याने दमदार अर्धशतकं झळकावली. मालिकेतील शेवटच्या टी-२० सामन्यात त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ८१ धावांवर बाद होऊन माघारी परतला. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या कामगिरीच्या बळावर त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. हा पुरस्कार पटकावताच त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

वैभवने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे तो जी कामगिरी करणार, ती ऐतिहासिक असणार आहे. पहिलं अर्धशतकं, लागोपाठ २ अर्धशतकांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केल्यानंतर, आता तो सर्वात कमी वयात मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू बनला आहे. याआधी हा रेकॉर्ड भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. वैभवने वय १५ वर्ष १२१ दिवस असताना मालिकावीर पुरस्कार पटकावला आहे. तर सचिन तेंडुलकरने वय १७ वर्ष ११२ दिवस इतकं असताना मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. आता हा रेकॉर्ड वैभव सूर्यवंशीने मोडून काढला आहे.

सचिनचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडल्यानंतर आणि मालिकावीर पुरस्कार पटकावल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, “मला खरंच खूप चांगलं वाटलं. हरारे गाठल्यानंतर आम्हाला २-३ दिवस सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. मला इथे अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मला इथे खेळायला आवडतं. सर्व खेळाडू , कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मला सपोर्ट केला. मी माझा गेम खेळत होतो. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये मी संघाला चांगली सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न केला.”

भारतीय संघाचा दमदार विजय

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर इशान किशनने २९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर ५ गडी बाद १९२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १५७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना ३५ धावांनी आपल्या नावावर केला.