१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. ख्रिस गेलला मागे टाकत त्याने आयपीएल इतिहासात आपलं नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं आहे. वैभव सूर्यवंशी अवघ्या एका वर्षाचा असताना युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने हा विक्रम केला होता. आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केला.
सनरायझर्स हैदराबादने एलिमिनेटर सामन्याची नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वालची जोडी सलामीला उतरली. वैभव व यशस्वीने ५ षटकांतच ७४ धावांचा मोठा डोंगर उभारला. वैभव सूर्यवंशीने चौथ्या षटकात अवघ्या १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलच्या प्लेऑफ इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरलं.
वैभव सूर्यवंशीने अर्धशतकी खेळीत ८ षटकार लगावत त्याने इतिहास घडवला. वैभव सूर्यवंशीने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला मागे टाकत आयपीएल इतिहासातील एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने या सामन्यात उतरण्यापूर्वी तो ५३ षटकारांवर होता, त्यानंतर त्याने या खेळीत आतापर्यंत ८ षटकार लगावत ६१ षटकारांचा टप्पा गाठला. एका आयपीएल इतिहासात इतके षटकार लगावण्याचा विक्रम आजवर कोणालाच जमला नव्हता.
वैभव सूर्यवंशीने तिसऱ्या षटकात पॅट कमिन्सला तर आस्मान दाखवलं. पॅट कमिन्सच्या षटकात त्याने दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत सामन्याला सुरूवात केली. त्यानंतर कमिन्सने एक वाईड चेंडू टाकला. यानंतर सलग तीन चेंडूंवर वैभवने ३ दणदणीत षटकार खेचले. तिसऱ्या षटकातच वैभवने १० चेंडूत ३६ धावा केल्या. तर राजस्थानचा संघ ४५ धावांवर पोहोचला होता. यानंतर चौथ्या षटकात साकिब हुसैनच्या गोलंदाजीवर ३ षटकार खेचत त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला व आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
६१* षटकार – वैभव सूर्यवंशी, २०२६
५९ षटकार – ख्रिस गेल, २०१२
५२ षटकार – आंद्रे रसेल, २०१९
५१ षटकार – ख्रिस गेल, २०१३
४५ षटकार – जोस बटलर, २०२२
