Vaibhav Sooryavanshi Confident Declaration Incident Video: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आपल्या आक्रमक फलंदाजीसोबतच अफाट आत्मविश्वासामुळेही सातत्याने चर्चेत असतो. वैभवने यंदाच्या मोसमात सर्वाधिक ७७६ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती, पण वैभवने पहिल्याच हंगामात ७०० धावा करणार असा मनाशी निश्चच केला होता आणि आत्मविश्वासाने त्याने साध्य करून दाखवलं. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराने वैभवचा आत्मविश्वास किती कमालीचा आहे याचा एक किस्सा सांगितला.

अवघ्या १५ वर्षांच्या वयातही मोठ्या सामन्यांमध्ये तो ज्या निडर वृत्तीने मैदानात उतरतो, त्याने संघातील वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षकांनाही प्रभावित केलं. संगकाराच्या मते, वैभव केवळ मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवत नाही, तर प्रत्यक्षात मैदानावर उतरत पूर्ण करण्याची क्षमता देखील त्याच्यात आहे. आयपीएल २०२६ मध्ये लखनौविरूद्ध राजस्थानचा संघ २२० धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करत होता. या सामन्यात सलामीला उतरण्यापूर्वी तो कोच आणि संघाला जे सांगून गेला, त्याने सर्वच जण चकित झाले होते.

२२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात करण्यापूर्वी त्याने १३ षटकार मारण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता आणि त्याने १३ ऐवजी १० षटकार त्या सामन्यात लगावले होते, त्याच्या धडाकेबाज खेळीने राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूममधील प्रत्येकाला थक्क केलं. वैभवचा हाच बिनधास्त स्वभाव आणि स्वतःवरील अढळ विश्वास आपल्याला दिसून आला.

वैभवने कोच संगकाराला डोळा मारला आणि काय सांगितलं होतं?

स्काय स्पोर्ट्स क्रिकेटशी संवाद साधताना कुमार संगकाराने वैभव सूर्यवंशीच्या आत्मविश्वासाबद्दल आणखी एक भन्नाट किस्सा सांगितला, “यावर्षी आमचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होता. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्हाला २२० धावांचा पाठलाग करायचा होता. आम्ही आधी क्षेत्ररक्षण करत होतो. तेव्हा वैभव माझ्याकडे चालत आला, डोळा मारला आणि म्हणाला, ‘कोच, अजिबात काळजी करू नका. सामना आपलाच आहे.’

“ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर त्याने डोनोव्हन फरेरा आणि लुहान-डे-प्रिटोरियसला सांगितलं, ‘तुम्ही दोघं ऐका… मी आता १३ षटकार मारणार आहे. ते झाल्यावर उरलेलं काम तुम्ही पूर्ण करा.’ प्रत्यक्षात त्याने १० षटकार लगावले होते. जेव्हा त्याचे पाच षटकार झाले होते, तेव्हा डोनोव्हन आणि प्रिटोरियस एकमेकांकडे पाहत होते आणि म्हणत होते, ‘हा काहीही काय बोलतोय?’ पण काही वेळातच ते दोघेही षटकार मोजायला लागले. कारण त्यांना जाणवलं की हा मुलगा खरंच आपलं म्हणणं खरं करून दाखवू शकतो. ही त्याच्या आत्मविश्वासाची लेव्हल आहे,” असं संगकाराने अखेरीस सांगितलं.