Vaibhav Suryavanshi accurate DRS call drops Ricky Bhui: दुलीप करंडक स्पर्धेत साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात खेळवला जात आहे. दुलीप करंडक स्पर्धेसाठी ईस्ट झोनचा उपकर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली होती. त्यावेळेस या निर्णयाबाबत बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कृतीने हा निर्णय योग्य कसा होता, हे सिद्ध केलं. दुलीप करंडक सामन्यादरम्यान डीआरएस (DRS) घेण्याचा निर्णय घेतल्यावर त्याच्यातील नेतृत्वगुण खऱ्या अर्थाने दिसून आले. फायनलमधील एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
साऊथ झोनच्या पहिल्या विकेटमध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षकाबरोबरच वैभव सूर्यवंशीचं मोठं योगदान आहे. पंचानी दिलेल्या निर्णयाविरुद्ध डीआरएसचा (DRS) योग्य वापर करण्याच्या बाबतीत वैभवचं सामन्यात किती लक्ष असतं आणि त्याच्या खेळाची समज हे दिसून आलं. दुलीप करंडक स्पर्धेत आतापर्यंत वैभवने घेतलेला प्रत्येक डीआरएसचा निर्णय अचूक ठरला आहे.
ही संपूर्ण घटना साउथ झोनच्या डावातील सहाव्या षटकात घडली; संघाची धावसंख्या १० असताना, वैभव सूर्यवंशीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संघाला रिकी भुईच्या रूपाने पहिला धक्का बसला. या अंतिम सामन्यात, साउथ झोनच्या पहिल्या डावादरम्यान सलामीवीर रिकी भुईविरुद्ध जोरदार अपील करण्यात आलं होतं. ईस्ट झोनचा गोलंदाज मुकेश कुमार याच्या एका चेंडूवर यष्टिरक्षक कुमार कुशाग्राने भुईला झेलबाद केल्याचं अपील केलं, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलं. नेमक्या याच वेळी वैभव सूर्यवंशीने आपली भूमिका बजावली.
उपकर्णधार म्हणून त्याने आपला कर्णधार इशान किशनला डीआरएस घेण्याचा सल्ला दिला. इशानने वैभवचा सल्ला मानून रिव्ह्यू घेतला; त्यानंतर चेंडू बॅटची कड घेत यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचा स्पाईक दिसून आला आणि तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय बदलला आणि रिकी भुईला ‘आऊट’ घोषित करण्यात आलं. बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वैभव सूर्यवंशी इशान किशनला अरे घे तू रिव्ह्यू घे, असं म्हणताना स्टंप माईकमध्ये ऐकू येत आहे.
“कुमार कुशाग्राने अप्रतिम झेल घेतला. मात्र, आता रिव्ह्यू घ्यायचा असेल तर वैभव सूर्यवंशीचं ऐका. त्याचं म्हणणं आधी ऐका. स्टंप माइकवर वैभव ईशान किशनला म्हणताना स्पष्ट ऐकू आलं, ‘मी सांगतोय, रिव्ह्यू घे. रिव्ह्यू घे.’ मुकेश कुमारने वैभव सूर्यवंशीला धन्यवाद म्हणायला हवं. रिव्ह्यू घेण्यामागे त्याचाच हात आहे,” अशी प्रतिक्रिया समालोचकाने थेट प्रक्षेपणादरम्यान दिली.
