Vaibhav Sooryavashi Record: भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपळी. वैभवने या डावात वादळी ८१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावण्याची संधी होती. त्याचं शतक जरी हुकलं असलं, तरीदेखील अर्धशतकी खेळी करुन त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

या मालिकेत संजू सॅमसनला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला तिन्ही सामन्यांमध्ये अभिषेक शर्मासोबत डावाची संधी मिळाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला होता. वैभवचं वयाच्या १५ व्या वर्षी झळकावलेलं हे पहिलंच शतक होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो २० धावा करुन माघारी परतला. आता तिसऱ्या सामन्यात त्याची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. वैभवने ३१ चेंडूंचा सामना करुन आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरं अर्धशतक झळकावलं. यासह तो वयाच्या १५ व्या वर्षी २ अर्धशतक झळकावणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

वयाच्या १५ वर्षी अर्धशतक झळकावण्याची कामगिरी नेपाळच्या कुशल मल्लाने देखील केली आहे. पण वैभव हा वयाच्या १५ व्या वर्षी २ अर्धशतकं झळकावणारा जगातील पहिलाच आणि एकमेव फलंदाज ठरला आहे. हा रेकॉर्ड मोडणं कठीण नव्हे, तर जवळजवळ अशक्य आहे. वैभवकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ८१ धावांवर बाद होऊन माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला.

भारतीय संघाने उभारला १९२ धावांचा डोंगर

या सामन्यातही भारतीय संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. अभिषेक शर्मा अवघ्या २ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि इशान किशनने मिळून भारताचा डाव सावरला. इशानने २९ धावांची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने २७ धावांचे योगदान दिले. वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ११ आणि रिंकू सिंगने २५ धावा करुन भारतीय संघाची धावसंख्या १९२ धावांवर पोहोचवली.