आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. नेहमी षटकारांनी सुरुवात करणाऱ्या वैभवने यावेळी चौकार मारून सुरुवात केली. त्याच्याकडे अर्धशतक झळकावण्याची संधी होती. पण २८ चेंडूत ४६ धावांची खेळी करून माघारी परतला. वैभवचं अर्धशतक थोडक्यात हुकलं, पण या फलंदाजाने ग्लेन मॅक्सवेलचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

वैभव सूर्यवंशीचं हे दुसरं आयपीएल हंगाम आहे. आतापर्यंत त्याला केवळ १३ वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. या रेकॉर्डच्या यादीत आणखी एका रेकॉर्डचा समावेश झाला आहे. वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये १३ डावानंतर सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकलं आहे.

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत खेळलेल्या १३ डावात एकूण ४४ षटकार खेचले आहेत. तर ग्लेन मॅक्सवेलने १३ डावांनंतर ३३ षटकार खेचले होते. षटकारांचा रेकॉर्डसह वैभव सूर्यवंशीने आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

आयपीएलमध्ये १३ डावानंतर सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

वैभव सूर्यवंशी – ४४ षटकार
ग्लेन मॅक्सवेल – ३३ षटकार
निकोलस पूरन/ मॅकगर्क – ३० षटकार

जलद गतीने धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत २२० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. हा १३ सामन्यानंतर कुठल्याही फलंदाजाचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. १३ सामन्यानंतर सर्वोत्तम स्ट्राईक रेटने फलंदाजी करण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने निकोलस पूरनला मागे टाकलं आहे. निकोलस पूरनने १३ सामन्यांमध्ये २११ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.

कोलकाताचा दमदार विजय

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांअखेर १५५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने ३९, तर शिमरन हेटमायरने १५ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना रिंकू सिंगने नाबाद ५३ धावांची खेळी केली. तर अनुकूल रॉयने नाबाद २९ धावांची खेळी केली. कोलकाताने हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला.