Vaibhav Sooryavanshi Creates History: आक्रमक आणि स्फोटक खेळी खेळणारा फलंदाज अशी ओळख तयार केलेल्या वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरूद्ध झुंजार खेळी करताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरी गाठेल. दरम्यान नाणेफेक जिंकत राजस्थानने फलंदाजीचा निर्णय घेतला, पण गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत वैभवच्या धावांवर नियंत्रण ठेवलं आहे. यादरम्यान त्याने ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात संथ अर्धशतक झळकावलं. वैभवने या सामन्यात ३१ चेंडूत अर्धशतक केलं. गुजरातच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत ठराविक अंतराने राजस्थानच्या फलंदाजांना माघारी धाडलं. पण सामन्याची स्थिती पाहून सूर्यवंशीने आपला खेळ बदलला आणि मैदानावर टिकून राहण्यात यशस्वी ठरला.
आपल्या या झुंजार खेळीदरम्यान त्याने आयपीएल इतिहासात सर्वात जलद १ हजार धावा करण्याचा विक्रम आता आपल्या नावे केला आहे. वैभवने २३ सामन्यांमध्ये आणि २२८ च्या स्ट्राईक रेटने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. सर्वात कमी वयात १ हजार धावा करण्याची कामगिरी वैभवने केली आहे. याशिवाय सर्वात कमी चेंडूत म्हणजेच ४४० चेंडूत १ हजार आयपीएल धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी चेंडू
४४० – वैभव सूर्यवंशी
५४५ – आंद्रे रसेल
५६० – टिम डेव्हिड
५७५ – ट्रॅव्हिस हेड
५७५ – फिल सॉल्ट
५९४ – हेनरिक क्लासेन
६०४ – वीरेंद्र सेहवाग
IPL इतिहासात ७०० धावा करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू
आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात, वैभव सूर्यवंशीने एकाच हंगामात जेवढे विक्रम मोडले आहेत, तेवढे विक्रम इतर कोणत्याही खेळाडूने मोडलेले नाहीत. एक अनकॅप्ड खेळाडू म्हणून एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर आधीच होता आणि आता त्याने आपल्या नावावर आणखी एका महत्त्वपूर्ण कामगिरीची भर घातली आहे. तो आयपीएलमध्ये एकाच हंगामात ७०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. एका हंगामात ७०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा वैभव हा केवळ पाचवा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी, विराट कोहलीने दोनदा, तर साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांनी प्रत्येकी एकदा ही कामगिरी केली आहे.
