Vaibhav Sooryavanshi Creates History in IPL: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएल सामन्यांमध्ये एकापेक्षा एक मोठमोठे विक्रम आपल्या नावे करत आहे. भारताचे मोठमोठे खेळाडू जी कामगिरी गेल्या १९ वर्षांत करू शकले नाहीत, ती १५ वर्षांच्या या पोराने फक्त आपल्या दुसऱ्या सीझनमध्ये केली आहे. बॉस बेबी अशी ओळख मिळवलेल्या वैभव सूर्यवंशीने षटकारांचा मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आता त्याच्यापुढे फक्त युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आहे.
वैभव सूर्यवंशीने लखनौविरूद्ध सामन्यात वादळी खेळी साकारत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. वैभवने या सामन्यात १० चेंडूत ५ धावा अशी संथ सुरूवात केली होती. पण एकदा लय मिळवल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि धावांचा पाऊस पाडला. वैभव ३८ चेंडूत ७ चौकार व तब्बल १० षटकारांसह २४४.७४ च्या स्ट्राईक रेटने ९३ धावा कुटल्या. यासह त्याने षटकारांचा मोठा विक्रमही आपल्या नावे केला.
वैभव सूर्यवंशी हा आयपीएलच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. १९ वर्षांच्या या आयपीएल इतिहासात आजवर कोणताच भारतीय खेळाडू अशी कामगिरी करू शकला नाही. वैभवने एका आयपीएल हंगामात आतापर्यंत ५३ षटकार लगावले आहेत. तर आयपीएल इतिहासात एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने २०१२ मध्ये ५९ षटकार लगावले होते. तर सर्वाधिक षटकारांच्या या यादीत वैभव सूर्यवंशी हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. याशिवाय विदेशी खेळाडूचं या यादीत दिसतात.
एका आयपीएल सीझनमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
ख्रिस गेल – ५९ षटकार – २०१२
वैभव सूर्यवंशी – ५३ षटकार – २०२६
आंद्रे रसेल – ५२ षटकार – २०१९
ख्रिस गेल – ५१ षटकार – २०१३
जोस बटलर – ४५ षटकार – २०२२
वैभवने अवघ्या २३ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं, जे या हंगामातील त्याचं सर्वात संथ अर्धशतक होतं. याचदरम्यान त्याने हंगामात ५०० धावा पूर्ण केल्या. त्याने हा टप्पा केवळ १३ डावांमध्ये त्याने गाठला आणि एका हंगामात ५०० धावा करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याचा प्रभावी फॉर्म कायम राहिल्यास तो यंदाच्या सीझनमध्ये ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडू शकतो.
ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडण्यासाठी ६ षटकारांची आवश्यकता आहे. वैभवला मुंबई इंडियन्सविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर हा मोठा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ जर प्लेऑफसाठी पात्र ठरला तर वैभव सूर्यवंशी षटकारांच्या संख्येत अधिक वाढ करत नवा विक्रम आपल्या नावे करेल.
