Vaibhav Sooryavanshi Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. वैभवने या हंगामात अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायर २ चा सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध सुरू आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. वैभव सूर्यवंशी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना ५०० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स संघाला क्वालिफायर फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिक बजावली आहे. हा हंगामात त्याने अनेकदा राजस्थान रॉयल्स संघाला वेगवान सुरुवात करून दिली आहे. या सुरुवातीचा फायदा घेत राजस्थान रॉयल्सने मोठी धावसंख्या उभारली आहे. या हंगामात त्याने एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड आधीच मोडला आहे. आता या रेकॉर्डच्या यादीत आणखी एक रेकॉर्डची भर पडली आहे.

आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज

वैभव सूर्यवंशी आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तो पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर हल्ला चढवतो. पण विकेट्स जात असताना तो एक बाजू धरून फलंदाजी करू शकतो, हे त्याने गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात दाखवून दिलं. या हंगामात त्याने सावध पवित्रा घेत फलंदाजी केली. कारण त्याचा जोडीदार यशस्वी जैस्वाल १ धाव करून माघारी परतला. त्यानंतर ध्रुव जुरेलनेही ७ धावा करून पॅव्हेलियनची वाट धरली. अशा स्थितीत वैभवने एकेरी दुहेरी धाव घेण्यावरही भर दिला. यादरम्यान त्याने आयपीएल २०२६ स्पर्धेत पावरप्लेमध्ये ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. याआधी कुठल्याही फलंदाजाला आयपीएल स्पर्धेतील एकाच हंगामात पावरप्लेमध्ये ५०० धावा करता आल्या नव्हत्या.

पावरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची फ्लॉप सुरुवात

राजस्थान रॉयल्स संघाने गेल्या सामन्यात पावरप्लेमध्ये दमदार सुरुवात केली होती. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीच्या जोडीने पावरप्लेमध्येच मोठी धावसंख्या उभारली होती. पण या सामन्यात असं होऊ शकलं नाही. यशस्वी जैस्वाल अवघ्या १ धावांवर माघारी परतला. तर ध्रुव जुरेल संघाची धावसंख्या ९ असताना ७ धावांवर माघारी परतला.