Vaibhav Sooryavanshi Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेत ६२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. राजस्थान रॉयल्सकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने दमदार सुरुवात केली. त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याने अभिषेक शर्माचा मोठा रेकॉर्ड मोडून आयपीएल स्पर्धेत इतिहास घडवला आहे.
१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा आपल्या पॉवरहिटिंगसाठी ओळखला जातो. हा युवा फलंदाज समोर कोण गोलंदाज आहे हे पाहतच नाही. पट्ट्यात चेंडू मिळाला की तो सीमारेषेबाहेर भिरकावून लावतो. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्याच हंगामात आणि वयाच्या १५ व्या वर्षी त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आता आयपीएल स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील वैभव सूर्यवंशीच्या नावे नोंदवला गेला आहे. यासह त्याने अभिषेक शर्माचा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ स्पर्धेत ४० षटकार खेचले होते. त्यामुळे त्याला एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी ३ षटकार खेचायचे होते. त्याने आधी २ षटकार खेचले. त्यानंतर त्रिपुरानाच्या गोलंदाजीवर आपल्या डावातील तिसरा षटकार खेचला. हा त्याचा आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४३ वा षटकार ठरला. अभिषेक शर्माच्या नावे आयपीएल स्पर्धेत ४२ षटकार मारण्याची नोंद आहे. पण वैभव सूर्यवंशीने हा रेकॉर्ड आता मोडून काढला आहे. आता आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजाचा रेकॉर्ड वैभव सूर्यवंशीच्या नावे आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहाात एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा ख्रिस गेलच्या नावावर आहे. आता वैभव सूर्यवंशी हा रेकॉर्ड मोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आयपीएल स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचणारे भारतीय फलंदाज
वैभव सूर्यवंशी – ४३ षटकार (२०२६)
अभिषेक शर्मा – ४२ षटकार (२०२४)
श्रेयस अय्यर – ३९ षटकार (२०२५)
विराट कोहली -३८ षटकार (२०१६)
विराट कोहली – ३८ षटकार (२०२४)
सूर्यकुमार यादव -३८ षटकार (२०२५)
