Vaibhav Sooryavanshi Cried After RR Defeat: आयपीएल २०२६ मध्ये आक्रमक, विक्रमी व झुंजार खेळी करत राजस्थान रॉयल्सला फायनलच्या उंबरठ्यावर आणलेला वैभव सूर्यवंशी राजस्थानच्या पराभवानंतर भावुक झाला. गुजरातने क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव केला. वैभव सूर्यवंशीच्या ९६ धावांच्या खेळीच्या बळावर राजस्थानने २१४ धावांचा डोंगर उभारला. पण संघाचे गोलंदाज गोलंदाजीत मात्र अपयशी ठरले आणि याचा फटका संघाला बसला.
दुसऱ्या क्वालिफायरनंतर आता आयपीएल २०२६ चे दोन फायनलिस्ट संघ ठरले आहेत. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ अंतिम सामन्यात भिडतील. हा अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान गुजरातच्या विजयानंतरही क्रिकेट विश्व मात्र वैभव सूर्यवंशीसाठी हळहळताना दिसत आहे.
राजस्थानच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशीला अश्रू अनावर
गुजरात-राजस्थानच्या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी मैदानाबाहेर गेला. संपूर्ण संघ मैदानावर असताना वैभव सूर्यवंशी एकटाच डगआऊटमध्ये बसून रडताना दिसला. राजस्थान संघाचे मॅनेजर रोमी भिंडर त्याचं सांत्वन करताना दिसले. वैभवचा हा व्हीडिओ पाहून क्रिकेट चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ फायनलच्य उंबरठ्यावर येऊन स्पर्धेबाहेर झाल्याने वैभव भावुक झालेला दिसला.
राजस्थान रॉयल्स सामना हरताच कॅमेरा वैभव सूर्यवंशीवर सर्वात आधी गेला. वैभव खूपच निराश झाला होता, त्याने टोपीने आपला चेहरा लपवला. वरिष्ठ खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्याशी बोलत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. हे संभाषण बराच वेळ चाललं. यानंतर वैभव सूर्यवंशी डगआऊटमध्ये गेला. त्याने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंशी हस्तांदोलनासाठी देखील पोहोचला नाही. तो डगआऊटमध्ये आपल्या टोपीने चेहरा लपवून बसलेला दिसला. मात्र, त्याचे पाणावलेले डोळे कॅमेऱ्यात कैद झाले.
वैभव सूर्यवंशीने या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आयपीएल २०२६ मध्ये ४८.५ च्या फलंदाजी सरासरीने ७७६ धावा केल्या. त्याने सर्वाधिक ७२ षटकार मारले आणि त्याचा स्ट्राइक रेट २३७.३१ होता. वैभव सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वाधिक धावांसह पहिल्या स्थानी आहे.
