Vaibhav Sooryavanshi Viral Video: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेला हा सामना बीसीसीआयच्या सेंट्रल ऑफ एक्सिलेंसच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सेंट्रल झोन संघाने २०० हून अधिक धावा केल्या आहेत. या सामन्यादरम्यान असा एक क्षण आला, जेव्हा भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी कर्णधाराच्या भूमिकेत दिसून आला. या स्पर्धेसाठी इशान किशनची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. पण, त्याच्या अनुपस्थितीत वैभव सूर्यवंशी संघाचं नेतृत्व करताना दिसला. यासह वैभव सूर्यवंशीच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

ज्यावेळी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी इशान किशनची कर्णधार आणि वैभव सूर्यवंशीची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. या सामन्यादरम्यान जेव्हा इशान किशनच्या हाताला दुखापत झाली, त्यावेळी वैभव सूर्यवंशी संघाचं नेतृत्व करताना दिसला. १९ व्या षटकात त्याच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं.

वैभव सूर्यवंशीच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

इशान किशनने मैदान सोडल्यानंतर त्याच्या जागी कुमार कुशाग्र संघाचं नेतृत्व करताना दिसून आला. वैभव अवध्या १५ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात खेळाडूंना रणजी संघात स्थान मिळणंही कठीण असतं, असं असताना वैभव दुलीप ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेत संघाचं नेतृत्व करत आहे. दरम्यान वैभव सूर्यवंशी हा दुलीप ट्रॉफीत संघाचं नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. वैभवने २०२४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. हा त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १० वा सामना आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २१५ धावा केल्या आहेत. यादरम्यान ९३ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

वैभव सूर्यवंशीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

तर झाले असे की ४० वे षटक टाकण्यासाठी अनुभवी गोलंदाज मुकेश कुमार गोलंदाजीला आला. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या जुयलच्या बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक कुमार कुशग्रच्या हातात गेला. पण अंपायरने त्याला नाबाद घोषित केलं. त्यावेळी वैभव सू्र्यवंशी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू लागला आहे की नाही, हे त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे डीआरएस घेऊ की नको, या विचारात तो डोकं खाजवू लागला. त्यानंतर शेवटचे काही सेंकद शिल्लक असताना, त्याने डीआरएसची मागणी केली आणि फलंदाज बाद असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान फलंदाज बाद होताच, वैभव सूर्यवंशी जल्लोष करताना दिसून आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.