Daryll Cullinan On Vaibhav Sooryavanshi: भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या तुफान चर्चेत आहे. आयपीएल २०२६ स्पर्धा गाजवल्यानंतर वैभवला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. यासह वैभव भारतीय संघात स्थान मिळवणारा सर्वात युवा खेळाडू बनला. पण त्याला अजूनही भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. आयर्लंडविरुद्धच्या २ टी-२० सामन्यांमध्ये आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. दरम्यान इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका सुरु असताना दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू डॅरिल कलिनन यांनी वैभव सूर्यवंशीला आगळावेगळा सल्ला दिला आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यादरम्यान वैभवने अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले. या हंगामात तो एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज ठरला होता. लवकरच तो भारतासाठी पदार्पण करु शकतो. पण डॅरिल कलिनन यांचं म्हणणं आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याआधी वैभवने शाळेत जावं, बालपण जगावं. त्यांच्या मते, वैभव फक्त १५ वर्षांचा आहे. इतक्या लवकर कठीण आव्हानं नको.

क्रिकइन्फोसाठी लिहिलेल्या एका कॉलममध्ये डॅरिल कलिनन यांनी लिहिले की, “आपण ज्या वैभव सूर्यवंशीला खेळताना पाहतोय, तो केवळ आपल्या वयापेक्षा सरस खेळणारा एक प्रतिभावान मुलगा नाही. तर हे असं काहीतरी आहे, ज्याचा क्रिकेट जगताने यापूर्वी कधीही सामना केलेला नाही. एक असा मुलगा जो आजवरच्या सर्वात जास्त व्यावसायिकदृष्ट्या शक्तिशाली, जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक चर्चेत असलेले भारतीय क्रिकेट आणि आयपीएलच्या केंद्रस्थानी आहे.”

तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “क्रिकेटमध्ये अनेक अद्भूत आणि विलक्षण प्रतिभा असलेले खेळाडू आले आहेत. अनेक युवा खेळाडू देखील आले, ज्यांना कमी वयातच ओळख मिळाली. वैभव सूर्यवंशी हा अवघ्या १५ वर्षांचा आहे. त्याचे आयुष्य सामान्य वेगाने पुढे जात नाहीये. खूप उशीर होण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. माझ्या मते, त्याने घरी जाऊन परिक्षेची तयारी करावी. मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळावं. जोपर्यंत संधी आहे, तोपर्यंत त्याने सामान्य मुलाप्रमाणे आपलं आयुष्य जगावं. याचा अर्थ असा मुळीच होत नाही, की त्याच्या कौशल्याकडे आपण दुर्लक्ष करावं.याचा अर्थ हा आहे की, ज्या व्यक्तीकडे कौशल्य आहे, त्याला पूर्णपणे विकसित व्हायला पुरेसा वेळ मिळेल.”

आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता.या स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४८.५० च्या सरासरीने आणि २३७.३१ च्या स्ट्राईक रेटने ७७६ धावा केल्या होत्या. यासह तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.या हंगामात त्याने ६३ चौकार आणि सर्वाधिक ७२ षटकार खेचले होते.यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली होती.