Vaibhav Sooryavanshi Historic Debut at Age of 15: ज्या क्षणाची संपूर्ण जगभरातील चाहते वाट पाहत होते, तो क्षण अखेरीस आला. १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अखेरीस भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी तिलक वर्माने त्याला पदार्पणाची कॅप दिली आहे. वैभव सूर्यवंशी हा पदार्पण करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. पदार्पण करताच वैभवने सचिन तेंडुलकरचा महाविक्रम मोडला आहे.

आपली ‘डेब्यू कॅप’ स्वीकारताच वैभवने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करणारा तो आता सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या १५ वर्षे आणि ९९ वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंनी त्याचं कौतुक केलं. वैभव यादरम्यान थोडा भावुक झालेला देखील दिसला.

यापूर्वी, पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूचा विक्रम दिग्गज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने १९८९ मध्ये वयाच्या अवघ्या १६ वर्षे आणि २०५ दिवस वय असताना पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. आता वैभवने वयाच्या १५ वर्षे आणि ९९ दिवस असताना पदार्पण करून सचिनचा ३७ वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडला आहे. आयर्लंड मालिकेपासूनच चाहते वैभवच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत होते.

भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे सर्वात तरुण खेळाडू

१५ वर्षे ९९ दिवस – वैभव सूर्यवंशी विरुद्ध इंग्लंड, २०२६
१६ वर्षे २०५ दिवस – सचिन तेंडुलकर विरुद्ध पाकिस्तान, १९८९
१७ वर्षे ७५ दिवस – पियुष चावला विरुद्ध इंग्लंड, २००६
१७ वर्षे ११८ दिवस – एल. शिवरामकृष्णन विरुद्ध वेस्ट इंडीज, १९८३
१७ वर्षे १५२ दिवस – पार्थिव पटेल विरुद्ध इंग्लंड, २००२
१७ वर्षे १९३ दिवस – मनिंदर सिंग विरुद्ध पाकिस्तान, १९८२

वैभव सूर्यवंशी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाच्या जागी खेळणार?

मँचेस्टर येथील टी-२० सामन्यात संजू सॅमसनच्या जागी खेळण्याची संधी वैभव सूर्यवंशीला मिळाली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांत संजू सॅमसन अपयशी ठरला होता आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही फलंदाजी करताना त्याला संघर्ष करावा लागला होता; त्यामुळेच भारतीय संघाने संजूच्या जागी वैभव सूर्यवंशीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. विशेष म्हणजे, वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि दोन हंगामांमधील आपल्या धडाकेबाज कामगिरीने सर्वांची मनं जिंकली.

भारताची इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यसाठी प्लेईंग इलेव्हन

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्षित राणा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती