Vaibhav Sooryavanshi Debut get delayed IND vs IRE: बीसीसीआयने आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी टी-२० संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून बाजूला करत श्रेयस अय्यरच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी दिली आहे. यादरम्यान आयपीएल गाजवणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची संघात निवड करण्यात आली होती. वैभव आयर्लंडविरूद्ध मालिकेमधून भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता होती. पण त्याचं पदार्पण लांबणीवर जाण्याची शक्यता दिसत आहे.

भारताचा आगामी आयर्लंड दौरा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेलफास्टमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या भारत-आयर्लंड टी-२० मालिकेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुरुवारी क्रिकेट आयर्लंडने जारी केलेल्या निवेदनात बेलफास्टमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असल्याचं सांगितलं. तसेच, आयरिश सीनियर कप आणि नॅशनल कपसह देशांतर्गत स्पर्धांच्या भवितव्याबाबत पुढील ४८ तासांत निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं.

हा घडामोडींचा क्रम भारतीय संघासाठी महत्त्वाच्या टप्प्यावर समोर आला आहे. सध्या भारताचा संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची तयारी करत आहे. ही मालिका शनिवारी सुरू होणार आहे. अफगाणिस्तान मालिकेनंतर भारतीय संघ २६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे होणाऱ्या दोन टी-२० सामन्यांसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, बेलफास्टमधील सध्याच्या परिस्थितीमुळे या मालिकेच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारत-आयर्लंड टी-२० मालिकेकडे क्रिकेटविश्वाचं विशेष लक्ष लागलं आहे. कारण या मालिकेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. निवड झाल्यास तो सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या ऐतिहासिक विक्रमालाही मागे टाकू शकतो. याच मालिकेद्वारे श्रेयस अय्यर याच्या भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचीही सुरुवात होणार आहे.

मात्र, बेलफास्टमध्ये अलीकडच्या काही दिवसांत अस्थिरता आणि स्थलांतरितांविरोधातील हिंसक दंगली उसळल्या आहेत. शहरातील एका भीषण चाकू हल्ल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याने क्रिकेट आयर्लंड सर्व पर्यायांचा विचार करत आहे. सुरक्षा धोक्याची स्थिती कायम राहिल्यास सामने बेलफास्टऐवजी डब्लिन येथे हलवण्याचाही पर्याय चर्चेत असल्याचे समजते.

बीसीसीआयने अद्याप या प्रकरणावर कोणतंही वक्तव्य न केल्याने सध्या तरी भारताचा आयर्लंड दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचं मानलं जात आहे. मात्र, बेलफास्टमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने सुरक्षितपणे आयोजित करता येतील का, याबाबतचा अंतिम निर्णय पुढील काही दिवसांत घेतला जाणार आहे. त्यामुळे येणारे दिवस या मालिकेच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.