भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरू आहे. हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. कारण गेल्या काही सामन्यांपासून एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे वैभव सूर्यवंशीचं पदार्पण कधी होणार? अखेर या सामन्यात संजू सॅमसनला विश्रांती देण्यात आली आणि वैभव सूर्यवंशीचं ऐतिहासिक पदार्पण झालं. यादरम्यान त्याने जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धचा टी-२० मालिकेत संधी दिली गेली नव्हती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याला खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. अखेर दुसऱ्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. यासह तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
षटकार मारून केली सुरुवात
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीची जोडी मैदानावर आली. यादरम्यान वैभवला पहिल्या षटकातील एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात जोश टंगच्या गोलंदाजीवर त्याने एक धाव घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खातं उघडलं. त्यानंतर तिसऱ्या षटकात वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर आमनेसामने आले. यादरम्यान पहिल्याच चेंडूवर वैभवने किपरच्या डोक्यावरून खणखणीत षटकार खेचला. यासह त्याने अनुभवी गोलंदाजांविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची परंपरा त्याने कायम ठेवली. याआधी आयपीएल २०२६ स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने अनेक दिग्गज गोलंदाजांच्या पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार खेचून सुरुवात केली होती.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
भारतीय संघ : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्षित राणा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड संघ : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.
