Vaibhav Sooryavanshi Reveals meaning of A Celebration: वैभव सूर्यवंशीच्या ९३ धावा आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने लखनौचा पराभव केला आणि प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. राजस्थानला आता प्लेऑफ गाठण्यासाठी अखेरचा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. यादरम्यान वैभव सूर्यवंशीच्या खेळीने मात्र सर्वांची मनं जिंकली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने केलेल्या सेलिब्रेशनमागे नेमका काय अर्थ आहे, याचा प्रश्न सर्वांना पडला होता. पण सामन्यानंतर याने त्याचा खुलासा केला नव्हता, आता राजस्थानने शेअऱ केलेल्या या व्हीडिओमध्ये मात्र त्याने सीक्रेट सांगितलं आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध वैभव सूर्यवंशीने अवघ्या २३ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतर वैभवचं सेलिब्रेशन त्याच्या पूर्वीच्या सेलिब्रेशनपेक्षा वेगळं होतं. यावेळी, वैभवने अर्धशतकानंतर ‘A’ ची खूण केली. वैभवच्या या ‘A’ च्या जल्लोषानंतर, सर्वजण त्याचा अर्थ लावू लागले. कोणी म्हटलं की, भारत ‘अ’ संघात निवड झाल्यामुळे त्याने तसा आनंद साजरा केला. सामन्यानंतरच्या सादरीकरणात जेव्हा मुरली कार्तिकने वैभवला त्याच्या सेलिब्रेशनचा अर्थ विचारला, तेव्हा त्याने यावर माहित नाही असं म्हणत सांगणं टाळलं. पण खरं तर, त्याला एक गहन अर्थ होता. ते ‘A’ सेलिब्रेशन त्याच्या आईशी संबंधित आहे.

वैभव सूर्यवंशीने नक्की कोणासाठी केलं होतं सेलिब्रेशन?

वैभव सूर्यवंशीने स्वतःच त्याच्या ‘A’ सेलिब्रेशनमागील सीक्रेट सांगितलं. पण त्याआधी, सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान त्याने मुरली कार्तिकच्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता, या सेलिब्रेशनचा कोणताही अर्थ नव्हता. त्याने ते असंच सेलिब्रेशन केलं होतं प्रत्येक सामन्यात मी वेगळं काहीतरी सेलिब्रेशन करतो, असंही त्याने सांगितलं. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी वैभवने असंही सांगितलं की, त्याने मागच्या वेळी केलेलं सेलिब्रेशनदेखील निरर्थक होतं.

त्यानंतर, राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरशी झालेल्या संभाषणात, वैभव सूर्यवंशीने ‘A’ सेलिब्रेशनबद्दल जे सांगितले त्यात स्पष्ट फरक दिसून आला. राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंदर यांच्याशी झालेल्या संभाषणात, वैभव सूर्यवंशीने ‘A’ सेलिब्रेशनचा अर्थ स्पष्ट करताना सांगितलं की, हे सेलिब्रेशन करत त्याने अर्धशतक त्याच्या आईला डेडिकेट केलं होतं. तिचं नाव ए वरून सुरू होतं. मला कोणाला खरंतर हे सांगायचं नव्हतं. कोणाला कळावं अशी इच्छा नव्हती, पण हो हे सेलिब्रेशन आईसाठी होतं. वैभव सूर्यवंशीच्या आईचं नाव आरती सूर्यवंशी आहे.