Vaibhav Sooryavanshi Emotional Video: आयपीएल २०२६ स्पर्धत वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचं वादळ पाहायला मिळालं आहे. बुधवारी या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक खेळी केली. त्याने एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड, प्लेऑफमध्ये वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली. यादरम्यान वैभवकडे सर्वात वेगवान शतक झळकावण्याची संधी होती. पण ही संधी अवघ्या ३ धावांनी हुकली. दरम्यान बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना तो भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वैभव सूर्यवंशी पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर हल्लाबोल करण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने पॅट कमिन्स आणि प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने ८ षटकार आणि १ चौकाराच्या साहाय्याने अवघ्या १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे प्लेऑफच्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. अर्धशतक झळकावल्यानंतर एका पाठोपाठ एक षटकार खेचले. तो २८ चेंडूंमध्ये ९७ धावांवर पोहोचला होता. ख्रिस गेलने ३० चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. त्यामुळे त्याला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी एका चेंडूत चौकार किंवा षटकार खेचायचा होता. पण षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला. जर या चेंडूवर त्याने चौकार किंवा षटकार खेचला असता, तर सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड मोडला गेला असता.

सर्वात वेगवान शतक झळकावण्याची संधी थोडक्यात हुकल्यानंतर वैभव ज्यावेळी पॅव्हेलियनमध्ये जात होता, त्यावेळी तो भावूक दिसून आला. त्याने मैदानाबाहेर जायला बराच वेळ घेतला. यासह त्याच्या डोळ्यात अश्रू होते. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडू आणि चाहत्यांसह सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांनी आणि खेळाडूंनी देखील या १५ वर्षीय फलंदाजाच्या खेळीचं कौतुक केलं. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. यासह सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनने देखील टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने २० षटकांअखेर ८ गडी बाद २४३ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. तर ध्रुव जुरेलने ५० धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकांअखेर ८ गडी बाद २४३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादचा डाव १९६ धावांवर आटोपला. यासह राजस्थान रॉयल्सने हा सामना ४७ धावांनी आपल्या नावावर केला.