Vaibhav Sooryavanshi Instagram Story: जगभरातील संपूर्ण चाहता वर्ग वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत होता आणि अखेरीस त्याला इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. यासह वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. वैभवने त्याच्या पदार्पणानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत.

वैभवला त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात केवळ १४ धावा करता आल्या असल्या, तरी त्याने आपल्या छोट्याशा खेळीदरम्यान नक्कीच प्रभावित केलं. वैभवने जोफ्रा आर्चरच्या पहिल्या चेंडूवर शानदार षटकार खेचला. सामन्यानंतर त्याने सोशल मीडियावर लिहिलं की, आपण एकेकाळी पाहिलेलं स्वप्न आता जगत आहोत.

वैभव सूर्यवंशीची पदार्पणानंतर पहिली प्रतिक्रिया

वैभवने इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्याचा फलंदाजीसाठी जातानाचा फोटो पोस्ट करत वर कॅप्शनमध्ये लिहिलं, “तुम्हा सर्वांचे मेसेज पाहून मी भारावून गेलो आहे. मला मिळालेलं अफाट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी माझ्या वरिष्ठांचे आणि हितचिंतकांचे आभार मानू इच्छितो. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी सदैव प्रयत्न करेन. पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.”

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात, वैभव सूर्यवंशीने अभिषेक शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात केली. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर वैभवने सामना केलेला पहिलाच चेंडू षटकारासाठी धाडताच स्टेडियम उत्साहाने दुमदुमून गेले. यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने नाणेफेकीदरम्यान सांगितल्याप्रमाणे त्याच्याविरूद्ध रणनीती अवलंबली.

नऊ चेंडूंचा सामना केल्यानंतर वैभव क्रिजवर स्थिरावला होता, परंतु अनुभवी विल जॅक्सने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि जोस बटलरने त्याला यष्टिचित (स्टंपिंग) केलं. अशा प्रकारे, वैभवच्या पदार्पणाच्या सामन्यातील खेळी अवघ्या दहा चेंडूंनंतर संपुष्टात आली; या खेळीदरम्यान त्याने एकूण दोन षटकार लगावले.

Vaibhav Sooryavanshi Instagram Story
वैभव सूर्यवंशीची इन्स्टाग्राम स्टोरी

भारतीय संघाला इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात चार गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून, जेकब बेथेलच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने १९१ धावांचे लक्ष्य सहा चेंडू शिल्लक असतानाच गाठलं. या विजयासह यजमान इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.