Vaibhav Sooryavanshi, IND-A vs SL-A: भारताचा अ संघ साध्य श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारतीय अ संघ, श्रीलंका अ संघ आणि अफगाणिस्तान अ संघ या तिन्ही संघामध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेसाठी भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीला भारतीय अ संघात स्थान देण्यात आलं आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या कामगिरीनंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली होती. पण या मालिकेत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तिन्ही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. श्रीलंका अ संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशी हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यासह सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्डही वैभव सूर्यवंशीच्या नावे नोंदवला गेला होता. वैभव तिरंगी मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याला केवळ ७९ धावा करता आल्या आहेत. वैभव मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. पण इथे त्याचा मजबूत पक्षच कमकुवत बाजू म्हणून समोर आला आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये तो मोठे फटके खेळताना बाद झाला आहे.
वैभव या मालिकेत श्रीलंकेविरुद्ध २ वेळा आणि अफगाणिस्तानविरुद्ध एक वेळा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना तो अवघ्या १४ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४४ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं होतं.
भारतीय संघाने जर या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर भारतीय संघाला आणखी एक सामना खेळण्याची संधी मिळेल. या सामन्यात वैभवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. कारण ज्या सामन्यात खेळाडूंवर दबाव असतो. अशावेळी वैभवची बॅट चांगलीच तळपते. तिरंगी मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ २ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत वैभवकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
