Vaibhav Sooryavanshi, India A vs Srilanka A: क्रिकेटविश्वात सध्या एकच नाव सध्या तुफान चर्चेत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. १५ वर्षांच्या या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या फलंदाजांनाही चांगलाच घाम फोडला. आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभवने दिग्गज फलंदाजांना मागे टाकत ऑरेंज कॅपवर नाव कोरलं. त्याची ही कामगिरी पाहून अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचं कौतुक केलं. ख्रिस गेलपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. वैभव आता श्रीलंकेत तिरंगी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

आयपीएल झाल्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तर भारतीय अ संघातील खेळाडू सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय अ संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंगची जोडी मैदानावर आली. दोघेही आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान दमदार फॉर्ममध्ये होते. पण श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात दोघांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण प्रभसिमरन सिंग ११ चेंडूंचा सामना करुन अवघ्या २ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी १२ चेंडूंमध्ये ३ चौकारांच्या साहाय्याने १४ धावा करुन माघारी परतला. या डावात तो फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसून आला. मोहम्मद शिराजच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला.

आयपीएलमध्ये चमकल्यानंतर वैभवला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्याची टी-२० क्रिकेटमधील फलंदाजी पाहता त्याला, वरिष्ठ संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. आगामी आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी वैभवला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याला आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. आता तो तिरंगी मालिकेत कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.