Vaibhav Sooryavanshi Batting In Duleep Trophy: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना ईस्ट झोन आणि साऊथ झोन या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. चेन्नईत सुरू असलेल्या या लढतीत ईस्ट झोनचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ईस्ट झोन संघाने सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इशान किशनच्या २७० धावांच्या खेळीच्या बळावर ईस्ट झोन संघाने ७०८ धावांचा डोंगर उभारला. या डावात वैभवने ४४ धावांची वेगवान खेळी केली होती. पण दुसऱ्या डावात फलंदाजी करताना तो अवघ्या ८ धावा करून माघारी परतला आहे.
दुसऱ्या डावात वैभवचा फ्लॉप शो
ईस्ट झोन संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ७०८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या साऊथ झोन संघाचा डाव अवघ्या ३३६ धावांवर आटोपला. त्यामुळे ईस्ट झोन संघाने मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरनची जोडी मैदानात आली. या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पण अभिमन्यू अवघ्या ३ धावा करून माघारी परतला. तर वैभव सूर्यवंशी त्रिपुराना विजय या फिरकी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर स्टेपआऊट होऊन षटकार मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत होऊन माघारी परतला. त्यामुळे वैभव अवघ्या ८ धावांवर माघारी परतला.
वैभवने टी-२० क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण रेड बॉल क्रिकेटमध्ये तो अजूनही नावाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. रेड बॉल क्रिकेटमध्ये परस्थितीशी जुळवून संयमाने फलंदाजी करावी लागते. पण वैभवने मोठे फटके मारण्यावर अधिक भर दिला आहे. या प्रयत्नात तो अनेकदा स्वस्तात बाद होतोय. त्यामुळे त्याला मोठे फटके खेळण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे.
दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेत वैभवची कामगिरी
दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी वैभवकडे ईस्ट झोन संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काहीवेळा इशानच्या अनुपस्थितीत त्याने संघाचं नेतृत्वही केलं. पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळत असलेल्या वैभवने ५ डावात फलंदाजी करताना ३८.४ च्या सरासरीने १९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ अर्धशतक झळकावलं आहे. वैभवकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ९२ धावांवर बाद होऊन माघारी परतला होता.
