१५व्या वर्षी तुम्ही पायथागोरसचं प्रमेय रट्टा मारत असाल. १५व्या वर्षी दहावीच्या सुट्टीत फिरायला अमुकच ठिकाणी जायचं असा हट्ट पालकांकडे करत असाल. अम्यूझमेंट पार्क किंवा भरपूर राईड्स असणाऱ्या ठिकाणी न्यायला आईबाबांना भरीस घालत असाल. १५व्या वर्षी तुम्हाला कॉलेजला जायचे वेध लागले असतीस. १५व्या वर्षी तुम्ही दोन वर्ष पुढच्या बारावीनंतर काय करायचं या विचारात असाल. कुठलं कॉलेज बरं पडेल, सीईटीसाठी कोणता क्लास लावावा याचा विचार तुमचे पालक करत असतील.इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरकीचं शिक्षण घेणार असाल तर कर्ज काढावं लागेल का याची चिंता पालकांना भेडसावत असेल.
सायकल नको आता बाईक घेऊन द्या असा हट्ट पालकांकडे करत असाल जरी लायसन्स मिळणार नसलं तरी. मित्रामित्रांमध्ये बाईक राईड करून झाली असेल. संध्याकाळी ऊन उतरली की मित्रांबरोबर पिक्चरला जाण्याचा बेत तुम्ही करत असाल. सकाळी पोहण्याचा क्लास लावला असेल. तुम्हाला एकट्याने मुंबईला जायचं असेल पण अजून लहान आहेस असं आईवडिलांकडून ऐकावं लागत असेल. सुट्ट्यांमध्ये लोळत फोन नाहीतर टीव्हीसमोर बसल्यामुळे तुम्ही आईचा ओरडा खात असाल. मित्रांबरोबर उंडारायला जमतं, आम्ही कुठे चल म्हटलं की नको होतं हेही तुमच्या कानी पडलं असेल. १५व्या वर्षी तुम्ही विराट किंवा रोहितच्या नावाचे जर्सी घालून फिरत असाल. क्रिकेट खेळताना संध्याकाळची आयपीएलची मॅच कोण जिंकणार यावर पैजा लावत असाल. असं एक ना अनेक. १५व्या वर्षी तुमचं आमचं आयुष्य सुखनैव होतं.
१५व्या वर्षी वैभव सूर्यवंशी देशाचा हिरो झाला आहे. १५व्या वर्षी तो जगातल्या भारी बॉलर्सना षटकार चोपतोय. १५व्या वर्षाच्या शाळकरी मुलाला कसं रोखावं यासाठी १५-२० वर्षाचा अनुभव असलेले कोच स्ट्रॅटेजी तयार करत आहेत. १५व्या वर्षी त्याच्या नावावर आयपीएल स्पर्धेत दोन शतकं आहेत. एका हंगामात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. काही दिवसांपूर्वीच स्पर्धेतलं सगळ्यात वेगवान शतक त्याच्या नावावर होता होता राहिलं. शाळकरी मुलासमोर ठिकऱ्या उडत आहेत त्यामुळे मोठमोठे गोलंदाज चक्रावून गेले आहेत. तो प्रामुख्याने चौकार-षटकार लगावतो. एकेरी-दुहेरी धावा कमीच काढतो. बाकीही खेळात काही उणीवा असतील पण हे सगळं असलं तरी त्याला रोखणं कर्मकठीण होतं आहे.
१५व्या वर्षी आयपीएलचं पहिलंवहिलं जेतेपद पटकावणाऱ्या संघाचा तो प्रमुख फलंदाज झाला आहे. क्रिकेट खेळतो का बेसबॉल हेही अनेकांना कळेना झालं आहे. त्याच्या बॅटच्या आकाराची, बॅटस्विंगची, त्याच्या टेक्निकची देशभर नव्हे जगभरात चर्चा आहे. १५व्या वर्षी त्याचं नाव ब्रँड झालं आहे. १५वर्षांचा आहे पण पठ्ठ्या काय खेळतो यार अशा चर्चा कट्टे-अड्ड्यांवर रंगू लागल्या आहेत. त्याच्यासाठी टीव्ही लावणारे चाहते आहेत. तो आऊट झाल्यावर टीव्ही बंद करणारे आहेत. कोणत्याही क्रीडा स्पर्धेचं प्रक्षेपणकर्त्या कंपनीला माहिती असतं की कुठले खेळाडू खपणीय आहेत. त्यांच्यावर सतत कॅमेरा असतो. ते काय करतात याकडे बारीक लक्ष असतं. आयपीएल स्पर्धेत धोनी, विराट, रोहित, हार्दिक, सूर्या यांच्याकडे सतत असणारे कॅमेरे आता वैभववर रोखून असतात. तो मैदानात येण्याआधी काय करतो, डगआऊटमध्ये काय करतो, टीम बसमध्ये कुठे बसतो सगळ्यावर लक्ष आहे. १५व्या वर्षी त्याच्या नियमित मुलाखती होतात. खणखणीत षटकारांसाठी लाखालाखाची बक्षीसं तो घेतो. नंतर फोटोग्राफर्सना सामोरा जातो. मग मुलाखती सुरू होतात.
१५व्या वर्षी त्याच्या खेळाचं विश्लेषण होतं आहे. तो कुठे उभा राहून खेळतो. कोणत्या ठिकाणी सर्वाधिक फटके मारतो, उसळत्या चेंडूंचा सामना करतो का, स्पिनला कसा खेळतो यावर पानंच्या पानं तयार होत आहेत. ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्या वयात तुम्ही आम्ही कार्ड गेम्स खेळायचो त्या वयात वैभवच्या रेकॉर्ड्सची कार्ड व्हायरल होत आहेत. त्याचं शतक हुकलं की देशभरात हळहळ व्यक्त होते आहे. बिहार म्हटलं की गरिबी, स्थलांतर, राजकारण याची चर्चा होत असे. बिहार म्हटलं की युपीएससीसाठी दिल्लीत धाव घेणाऱ्या तरुणांची चर्चा होत असे. बिहार म्हटलं की कोसी नदीच्या पुराची चर्चा होते. बिहार म्हटलं की माफियाराजची चर्चा होते. वैभवच्या निमित्ताने बिहारला नवी ओळख मिळाली आहे. मुंबई-दिल्ली-कर्नाटक ही क्रिकेटची सत्ताकेंद्र आहेत. वैभवच्या निमित्ताने हा लंबक बिहारच्या दिशेने झुकला आहे.
त्याचे आईवडील काय करतात, कोच कोण आहेत याची चर्चा होते आहे. समस्तीपूरजवळच्या ताजपूर या त्याच्या गावात वैभवचं घर पाहायला येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. हळूहळू ते पर्यटन केंद्रच होण्याची लक्षणं आहेत. १५व्या वर्षी १.१ कोटींचं राजस्थान रॉयल्सचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे आहे. १५व्या वर्षी तो जाहिरातीत झळकला आहे. आयपीएलच्या निमितातने सप्ततारांकित हॉटेलात राहतो आहे. बिझनेस क्लासने प्रवास करतो आहे. देशांग्ल वातावरणात वावरतो आहे. राजस्थानचा संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता नाही पण केलंच तर आयपीएल इतिहासातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक संघ ट्रेडऑफमध्ये त्याला घेण्यासाठी आतूर आहेत.
मोठ्यांच्या पाया पडून आशिर्वाद घ्यायचे हे घरच्यांनी शिकवलं असल्यामुळे वैभव अगदी सहज महान दिग्गज खेळाडूंच्या पाया पडताना दिसतो. त्यांचा उल्लेख सर असा करतो. ३ तासांच्या सामन्यात, मॅच संपल्यावर, टीम बसमध्ये, हॉटेलात, एअरपोर्टवर, कार्यक्रमांमध्ये त्याच्याकडे लक्ष असतं. १५व्या वर्षी त्याच्या नावाचा जयघोष करणारे चाहते मैदानात दिसतात. १५व्या वर्षी तो कुणाबरोबर तरी सेल्फी घेण्याचं वय असताना त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडते. एकप्रकारे झळाळत्या कर्तृत्वाने त्याचं बालपण, निरागसता संपून गेली आहे. कुमार संगकारा, विक्रम राठोड अशी जाणती मंडळी राजस्थानच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे काही चुकलं तर हक्काने ओरडणारी मंडळी आहेत. पण आयपीएल फक्त दोन महिने चालतं. १५व्या वर्षीच त्याला भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून बघितलं जात आहे. त्याला भारताच्या टी२० संघात घ्या अशी मागणी होऊ लागली आहे. उपजत प्रतिभेला अथक परिश्रमाची जोड देत १६व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना होते आहे. पण सचिन एखादाच असतो. नेक्स्ट बिग थिंग म्हणवले गेलेले अनेक खेळाडू पैसा आणि प्रसिद्धीच्या गर्तेत अडकून भरकटले आहेत. काहीजण कामगिरीत सातत्य राखता न आल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेत. १४० कोटींच्या देशात केवळ १५ जणांचीच निवड होते आणि ११च खेळू शकतात. तिथवर पोहोचण्यासाठीच प्रचंड स्पर्धा आहे. आयपीएलच्या एका संघाच्या ताफ्यात २५जण असतात. अनेकजण बेंचवरच बसतात.
अगदी काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या मैदानांवर क्रिकेटची धुळाक्षरं गिरवून धावांची टांकसाळ उघडणाऱ्या पृथ्वी शॉ याला नेक्स्ट बिग थिंग म्हटलं गेलं. पृथ्वी शॉ यंदा दिल्ली संघात होता. एकाही सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही. एका सामन्यावेळी तर तो बाऊंड्रीजवळ बसून सहकाऱ्यांबरोबर चिमणी उडाली खेळ खेळताना दिसला. प्रचंड पैसे मिळू लागल्यानंतर त्याचं नियोजन करण्यासाठी माणसं लागतात. पैशाने डोक्यात हवा जाते ती जाऊ नये यासाठी योग्यवेळी खडसावणारी माणसं लागतात. तुम्ही यशस्वी होता तसं प्रतिस्पर्धी संघ तुमचा अभ्यास करतात. कच्चे दुवे खणून काढतात. तुमच्या खेळातल्या उणिवा दूर करण्यासाठी माणसं लागतात. सोशल मीडिया एक दिवस हिरो बनवते, दुसऱ्या दिवशी ट्रोलर्स तुम्हाला लक्ष्य करतात. सतत कोणाची ना कोणाची नजर असल्यामुळे मनमुराद वागण्याची संधी वैभव हरवून बसला आहे. अपयशाचा तसंच बॅडपॅचचा सामना कसा करता तेही महत्त्वाचं असतं. शतकं होत आहेत, षटकार बसत आहेत तोवर सगळं छानच आहे. १५व्या वर्षी त्याची गर्लफ्रेंड कोण हे शोधणारे लोक आहेत.
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक रील व्हायरल झालं होतं. धाव घेताना तोल जाऊन वैभव स्टंप्सवर पडतो. टीम बसमधल्या दिव्यांच्या बटनांशी खेळत असतो. सामना संपल्यानंतर पुरस्कार घेण्यासाठी जाताना ढगळ पँटवर असतो. पुरस्कार घेतल्यावर ती पँट काढतो. हाफपँटवर वावरू लागतो. ती ट्रॅकपँट गुंडाळून मानेभोवती स्कार्फ करतो. आईस्क्रीम खूप आवडतं असं तो सांगतो. वेळ मिळाला की कार्टून्स पाहायला आवडतं असंही सांगतो. १५व्या वर्षाच्या बाकी मुलांना हे आवडतं म्हटल्यावर ओरडा मिळू शकतो पण वैभव करतो म्हटल्यावर हे सगळं स्टेटस सिम्बॉल झालं आहे.
जाहिरातदारांना, प्रक्षेपणकर्त्या कंपनीला एक चेहरा लागतो किंवा गोष्ट लागते. वैभवची गोष्ट त्यांच्यासाठी पुरेशी खपणीय आहे. ‘वंडरकिड’ अशी बिरुदावली त्याला मिळाली आहे. १५व्या वर्षी अचंबित करणाऱ्या प्रभुत्वासह तो भल्याभल्या गोलंदाजांना निरुत्तर करतो आहे. तो यशस्वी होतच राहावा, त्याने नवनवी शिखरं गाठावीत, विक्रम रचावेत हे चाहत्यांना वाटणं साहजिक. आश्चर्याचं हे ‘वैभव’ टिकवणं हेच खरं आव्हान आहे.
