Vaibhav Sooryavanshi Emotional Post: भारताचा युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात तर स्थान मिळत आहे, पण प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळत नाहीये. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीच्या चारही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळालेली नाही. पाचव्या सामन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सामन्याआधी त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेली स्टोरी तुफान चर्चेत आहे.
वैभव सूर्यवंशीची स्टोरी तुफान चर्चेत
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पाचव्या टी-२० सामन्याआधी वैभवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. त्याने नेट्समध्ये सराव करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने, ‘still believing’ असं लिहिलं आहे. वैभव सूर्यवंशीला अजूनही पूर्ण विश्वास आहे की, त्याला संधी मिळू शकते. वैभवला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, त्याने संधीचं सोनं केलं आहे. पण संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासारखे फॉर्ममध्ये असलेले सलामीवीर असताना वैभवला आपल्या संधीची वाट पाहावी लागत आहे.
वैभव सूर्यवंशीची कामगिरी
वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीच्या बळावर आयपीएल २०२६ स्पर्धा गाजवली होती. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक षटकार खेचून आणि सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप पटकावली होती. या कामगिरीच्या बळावर त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी दिली गेली होती. इंग्लंड दौऱ्यावर त्याने भारतीय संघासाठी पदार्पण केलं. आतापर्यंत झालेल्या ८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २४६ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ३०.७५ च्या सरासरीने केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावली आहेत. तर १८ षटकार खेचले आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेआधी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक धावा करून मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारत – वेस्ट इंडिज मालिकेतील पाचवा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
