Vaibhav Sooryavanshi Fight With Srilankan Players: भारत अ आणि श्रीलंका अ या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. भारतीय संघ सध्या तिरंगी मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. डंबुलाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने २६५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेलाही २६५ धावांपर्यंत मजल मारता आली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये १६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ९ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने गमावल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात धक्काबुक्की झाली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू जल्लोष करताना दिसले. तर वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे हे दोघेही मैदानाबाहेर जात होते. त्यावेळी वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये वाद झाला. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. वैभव सूर्यवंशी काहीतरी घडल्यामुळे नाराज होता. श्रीलंकेच्या खेळाडू आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे दिसत होते. सामना संपल्यानंतर वैभव आणि सूर्यांश दोघेही मैदानाबाहेर जात होते. इतक्यात वैभव थांबला आणि मागे फिरला. तो श्रीलंकेच्या खेळाडूंना काहीतरी बोलताना दिसून आला.

विशन हलमबागे हा सूर्यांशला काहीतरी बोलताना आणि त्याच्या अंगावर धावून जाताना दिसला. हे पाहून वैभव सूर्यवंशीने आपल्या साथीदारीला पाठींबा देण्यासाठी मध्यस्थी केली. वैभवने विशन हलमबागेला डाव्या हाताने धक्का देऊन मागे ढकलले. हे पाहताच निरोशन डिकवेलाने धाव घेत दोघांना एकमेकांपासून दूर केले. तर कर्णधार सहान अराचिगेनेही वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संघातील सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना मैदानावर काय घडलं, याबाबत कुठलीही कल्पना नव्हती.

त्यानंतर मैदानाबाहेर जात असताना वैभव सूर्यवंशीने जेव्हा पुन्हा एकदा मागे वळून पाहिले आणि श्रीलंकेच्या खेळाडूला कडक शब्दात सुनावले. त्यानंतर जेव्हा खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात आले. त्यावेळी युधवीर सिंगने श्रीलंकेच्या कर्णधाराला त्याच्या खेळाडूंच्या वागणुकीबद्दल जाब विचारला.त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन केले. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.