देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस
Vaibhav Sooryavanshi LikelyTo India T20I Debut After IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी धुमाकूळ घालत आहे. आयपीएल पदार्पण, अंडर-१९ क्रिकेट आणि अंडर-१९ विश्वचषकातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने सातत्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. वैभवची मोठे फटके खेळण्याची क्षमता आणि आक्रमक दृष्टीकोन यामुळे तो अवघ्या काहीच चेंडूत मोठी खेळी साकारतो. त्याची ही कामगिरी पाहून वैभवला लवकरच भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली पाहिजे, अशी सातत्याने मागणी होत आहे. आता वैभवच्या पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. सलामीवीर वैभवने आतापर्यंत दोन वेळा १५ चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाज असलेले जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर त्याने षटकारांची आतिषबाजी केली.
वैभव सूर्यवंशी कोणत्या मालिकेतून करणार भारतासाठी पदार्पण?
आयपीएलनंतर जून २०२६ मध्ये होणाऱ्या भारताच्या आयर्लंड दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीची निवड होण्याची शक्यता आहे. निवड झाल्यास, तो देशाचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या व्हाईट-बॉल दौऱ्यापूर्वी होणाऱ्या या छोट्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत निवड समिती या १५ वर्षीय खेळाडूला मोठी संधी देऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही मोठी माहिती दिली आहे.
“तो आयर्लंड दौऱ्यासाठीच्या दावेदारांपैकी एक असून, निवड समितीने इतर अनेक खेळाडूंसोबत त्याचं नाव शॉर्टलिस्ट केलं आहे,” असं सूत्रांनी सांगितलं. या डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या हंगामात जगातील काही सर्वोत्कृष्ट गोलंदाजांना धूळ चारली होती. या वर्षीही तो आपला फॉर्म कायम ठेवत खेळत आहे.
या हंगामात आतापर्यंत वैभव सूर्यवंशीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २६ चेंडूंमध्ये ७८ धावा, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १७ चेंडूंमध्ये ५२ धावा आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या आहेत. त्याने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि जोश हेझलवूडसारख्या गोलंदाजांचाही पूर्ण आत्मविश्वासाने सामना केला.
राष्ट्रीय निवड समिती या युवा खेळाडूला भारतीय संघात स्थान देण्यासाठी जास्त वेळ थांबू इच्छित नाही, परंतु ते त्याला एका साधारण संघाविरुद्ध खेळण्याची संधी देण्याची शक्यता आहे. जर वैभव सूर्यवंशीची धावांची प्रभावी मालिका अशीच सुरू राहिली, तर निवड समिती त्याची आयर्लंडमधील आगामी मालिकेसाठी तसेच या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड करण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, “या आयपीएल २०२६ हंगामात वैभव सूर्यवंशीने काय जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. हा हरहुन्नरी खेळाडू निश्चितपणे भारतीय संघासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनण्यास पात्र आहे. इतका प्रतिभावान आणि इतक्या लहान वयात अशी कामगिरी करणारा खेळाडू भेटणं दुर्मिळ आहे. भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून त्याच्या नावाचा नक्कीच समावेश व्हायला हवा.”
भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिनने वयाच्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण आता वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळाल्यास तो १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय डेब्यू करणारा भारताला पहिला खेळाडू ठरू शकतो. तर महिला क्रिकेटमध्ये शफाली वर्माने वयाच्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
