Vaibhav Sooryavanshi, India vs Afghanistan 2nd T20I: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यावर असताना टी-२० पदार्पणाची संधी दिली गेली होती. या मालिकेत तो आपली छाप सोडू शकला नव्हता. पण त्यानंतर झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याने चमकदार कामगिरी केली आणि मालिकावीर पुरस्कार पटकावला. आता भारतीय संघ मायदेशात अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. आता दुसऱ्या सामन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

वैभव सूर्यवंशी दुसऱ्या सामन्यातही बाकावर?

मालिकेतील पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा या जोडीला संधी दिली गेली होती. आता दुसऱ्या सामन्यातही वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. यामागचं कारण असं की, पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत,दमदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे त्याला बसवणं जरा कठीण आहे. तर टी-२० वर्ल्डकप विजयाचा हिरो संजू सॅमसन पहिल्या सामन्यात १० धावा करून माघारी परतला. एका डावाच्या आधारावर संजू सॅमसनला विश्रांती देणं, हा संजू सॅमसनवर अन्याय ठरेल.

संजू सॅमसनने अनेकदा भारतीय संघासाठी महत्वाची खेळी केली आहे. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संजू सॅमसनला कमीतकमी २ संधी तर दिली जाऊ शकते. याआधी ३ डावात फ्लॉप ठरल्यानंतर संजू सॅमसनला प्लेईंग ११ मधून बाहेर करण्यात आलं होतं. यावरून टीम मॅनेजमेंटवर जोरदार टीका देखील झाली होती. त्यामुळे संजू सॅमसनला इतक्यात तरी बाकावर बसवलं जाणार नाही. वैभव सूर्यवंशीला भारतात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल.

वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या सामन्यासाठी संधी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण जर दुसऱ्या टी-२० सामन्यातही अभिषेक शर्माची बॅट तळपली, तर त्याला तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. कारण ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या स्पर्धेसाठी पूर्णपणे फिट राहावं म्हणून अभिषेकला विश्रांती देऊन, त्याच्याजागी वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.