भारत अ संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीची निवड झाल्यानंतर सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर होत्या. पण वैभव सूर्यवंशी मात्र त्याच्या कामगिरीपेक्षा मैदानावर झालेल्या एका वादावरून अधिक चर्चेत आला आहे. १५ जूनला ‘श्रीलंका अ’ विरुद्धच्या तिरंगी मालिकेतील सामन्यात ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभव झाल्यानंतर, सूर्यवंशीची एका श्रीलंकन खेळाडूशी बाचाबाची झाली; या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पण या लढाईनंतर वैभव सूर्यवंशी कोणाचातरी आशीर्वाद घेतानाचा व्हीडिओदेखील पाहायला मिळाला.
भारत अ संघाला श्रीलंका अ संघाविरूद्ध तिरंगी मालिकेतील तिसरा सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने १८ धावांचं आव्हान भारताला दिलं, पण वैभव सूर्यवंशी व सूर्यांश शेडगे ही जोडी धावा करण्यात अपयशी ठरली आणि भारताला पराभव पत्करावा लागला. यानंतर वैभव सूर्यवंशीची श्रीलंका अ संघाच्या खेळाडूंबरोबर बाचाबाची झाली होती. यादरम्यान वैभवने श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का मारताना दिसला होता.
सामन्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वैभव सूर्यवंशीने दिग्गज श्रीलंकन खेळाडू अनुरा तेन्नेकून यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वैभवने त्यांच्या पायाला स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला. अनुरा तेन्नेकून हे श्रीलंकेचे पहिले एकदिवसीय (ODI) कर्णधार होते आणि त्यांनी १९७५ च्या विश्वचषकात संघाचे नेतृत्व केले होते; त्यांची डंबुला येथे १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची भेट झाली.
या भेटीदरम्यान, त्यांनी वैभवला फक्त आशीर्वाद दिला नाही, तर त्याला अनुरा तेन्नेकून यांच्याकडून मोलाचा सल्लाही मिळाला. त्यांनी वैभवला सांगितलं की, लोक काय म्हणतायत याची चिंता करू नकोस आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रित कर. वैभव सूर्यवंशीने मैदानावर वाद घातल्यानंतर त्याच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, पण काहीच वेळात व्हायरल झालेल्या या व्हीडिओमधील त्याची कृती पाहून सर्वच जण त्याचं कौतुक करत आहेत.
१५ जून रोजी श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने १४ चेंडूंत २१ धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान त्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावले. प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंका ‘अ’ संघानेही निर्धारित ५० षटकांत २६५ धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्यामुळे ‘सुपर ओव्हर’ खेळवण्यात आली, ज्यामध्ये भारत ‘अ’ संघाचा पराभव झाला.
