Vaibhav Sooryavanshi can face Punishment from ICC: वैभव सूर्यवंशी सहसा आक्रमक फटकेबाजीमुळे आणि वादळी खेळींमुळे चर्चेत असतो, परंतु श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत एका वादामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. ‘इंडिया ए’ संघाचा पराभव झाल्यानंतर सूर्यवंशी आणि ‘श्रीलंका ए’ संघातील एका खेळाडूमध्ये बाचाबाची झाली; सामना जिंकल्यानंतर ‘श्रीलंका ए’च्या खेळाडूंनी आक्रमकपणे जल्लोष केला होता आणि ते सूर्यवंशीच्या अगदी जवळ जाऊन सेलिब्रेशन करत होते. यादरम्यान वैभव आणि त्या खेळाडूमध्ये धक्काबुक्की झाली होती, यानंतर आता वैभवने आधी धक्का दिल्याने आयसीसीने काय निर्णय घेणार, त्याला कोणती शिक्षा देणार, आयसीसीचा काय नियम आहे, जाणून घेऊया.

डंबुला येथे खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेतील एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला. निर्धारित ५० षटकांचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांची धावसंख्या समान (टाय) राहिली, ज्यामुळे विजेते ठरवण्यासाठी ‘सुपर ओव्हर’ खेळवण्यात आली. मात्र, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका ‘अ’ संघाने विजय मिळवत भारत ‘अ’ संघाचा पराभव केला.

सामना संपल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. श्रीलंकेचा विशन हलांबागे आणि भारताचा वैभव सूर्यवंशी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. परिस्थिती इतकी चिघळली की, या दोघा खेळाडूंमध्ये शारीरिक झटापटही झाली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून ‘श्रीलंका अ’ संघाचा यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याने मध्यस्थी केली आणि त्या खेळाडूंना एकमेकांपासून दूर केलं. आता सर्वांचं लक्ष सामनाधिकाऱ्यांकडे लागले आहे. सामनाधिकारी या दोन्ही खेळाडूंना ताकीद देतात की खेळाडूंवर अधिकृत दंडात्मक कारवाई करतात, असा प्रश्न पडला आहे.

काय सांगतो आयसीसीचा नियम?

आयसीसीच्या (ICC) आचारसंहितेतील कलम २.१२ नुसार कोणत्याही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य, पंच, सामना रेफरी किंवा इतर व्यक्तीसोबत अयोग्य शारीरिक संपर्क साधणे हा नियमभंग मानला जातो. या नियमानुसार क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित शारीरिक संपर्क निषिद्ध आहे. एखादा खेळाडू जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे दुसऱ्या खेळाडूला, पंचाला धक्का देतो, खांदा मारतो किंवा अन्य प्रकारे शारीरिक संपर्क साधतो, तर त्याला दोषी ठरवले जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये संबंधित खेळाडूला इशारा, दंड किंवा डिमेरिट गुणांची शिक्षा दिली जाऊ शकते.

दरम्यान, तिरंगी मालिकेत भारत अ संघाचा पुढील सामना १७ जून रोजी अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध होणार आहे. अंतिम फेरीतील आशा कायम राखण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. अन्यथा अंतिम फेरी गाठणे कठीण होऊ शकते.