Vaibhav Sooryavanshi Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. मुल्लानपूरच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान राजस्थानला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. पण वैभव सूर्यवंशी खंबीरपणे उभा राहिला. गेल्या सामन्यात त्याचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं होतं. यावेळी त्याचं शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. त्याचं शतक हुकलं असलं तरीदेखील त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

वैभव सूर्यवंशी पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. पण संघाला जेव्हा जेव्हा गरज असते, तेव्हा तो चौकार – षटकारांसह एकेरी दुहेरी धावा घेऊन एक बाजू धरून ठेऊ शकतो. हे त्याने या सामन्यात दाखवून दिलं. वैभव सूर्यवंशी पहिल्यादांच १८ व्या षटकात फलंदाजी करताना दिसून आला. यासह तो ४७ चेंडू खेळून ९६ धावांवर माघारी परतला. यादरम्यान त्याने जोस बटलरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने चौकार आणि षटकारांचे सर्वच रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आतापर्यंत त्याने १२९ चौकार – षटकार खेचले आहेत. यासह तो आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक चौकार – षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. यादरम्यान त्याने जोस बटलरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. जोस बटलरने २०२२ मध्ये झालेल्या हंगामात १२८ चौकार – षटकार खेचले होते. तर विराट कोहलीच्या नावे एकाच हंगामात १२१ चौकार- षटकार मारण्याची नोंद आहे. विराटने हा कारनामा २०१६ मध्ये केला होता. तर डेव्हिड वॉर्नरने देखील २०१६ मध्ये ११९ चौकार- षटकार खेचले होते. आता या दिग्गज फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी सर्वात वरच्या स्थानी आहे.

आयपीएल स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक चौकार- षटकार खेचणारे फलंदाज

वैभव सूर्यवंशी – १२९ (२०२६)
जोस बटलर – १२८ (२०२२)
विराट कोहली – १२१ (२०१६)
डेव्हिड वॉर्नर- ११९ (२०१६)
शुबमन गिल – ११८ (२०२३)
साई सुदर्शन – १०९ (२०२५)