Vaibhav Sooryavanshi Fail: वैभव सूर्यवंशीची बॅट श्रीलंकेत शांत राहिली. वादळी सुरूवातीची अपेक्षा असणारा वैभव प्रत्येक सामन्यात स्वस्तात माघारी परतला. भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात वैभवने काही आक्रमक फटके खेळले पण मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने वैभवला बाद केल्यानंतर त्याला शांत राहण्याचा इशारा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वैभव सूर्यवंशीने या मालिकेत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, परंतु त्याला एकदाही ५० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. टी-२० क्रिकेटच्या तुलनेत त्याची एकदिवसीय (ODI) सामन्यांमधील फलंदाजी तितकीशी प्रभावी ठरलेली नाही. अफगाणिस्तानविरूद्ध सामन्यात वैभवला ४ वेळा जीवदान मिळालं, पण अखेरीस तो पाचव्यांदा बाद झाला.

श्रीलंकेच्या खेळाडूंसोबतच्या चकमकीनंतर तिरंगी मालिकेतील आपल्या पुढील सामन्यासाठी मैदानात उतरलेल्या वैभव सूर्यवंशीची खेळी शून्यावरच संपण्याची चिन्ह होती; मैदानातील पंचांनी त्याला ‘आऊट’ देखील दिलं होतं. मात्र, व्हिडिओ विश्लेषणांनंतर ‘थर्ड अंपायर’ने तो निर्णय फिरवला आणि वैभव शून्यावर बाद होण्यापासून थोडक्यात वाचला. तरीही, या सामन्यात त्याला मिळालेली ही एकमेव संधी नव्हती; त्यानंतर त्याला आणखी चार वेळेस जीवदान मिळालं. इतक्या संधी मिळाल्यानंतरही वैभव सूर्यवंशीने अफगाणिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध ३८ धावांची खेळी केली.

वैभव सूर्यवंशी या मालिकेत फेल ठरल्याने सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय आहे. वैभवला चांगली सुरूवात मिळाली, पण शॉर्ट बॉलवर तो पुन्हा एकदा बाद झाला. आयपीएल २०२६ मध्येही वैभव ४ वेळा शॉर्ट बॉलवर बाद झाला होता आणि तीच चूक त्याने पुन्हा केली. यासह वैभवने २८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांची खेळी केली. तर प्रियांश आर्यने अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला. प्रियांश ४२ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ५८ धावा केल्या.

वैभव सूर्यवंशीची संपूर्ण मालिकेतील कामगिरी

या संपूर्ण तिरंगी मालिकेत वैभवची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. तो वेगाने धावा करत असला, तरी एकदिवसीय सामन्यांमध्ये मोठ्या खेळींची गरज असते आणि तशी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वैभवला १२ चेंडूंमध्ये केवळ १४ धावा करता आल्या. दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात त्याने २२ चेंडूंत ४४ धावा केल्या; ही या मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. तिसऱ्या सामन्यात पुन्हा श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याला १४ चेंडूंत केवळ २१ धावा करता आल्या. त्यानंतर, चौथ्या सामन्यात ३८ धावा केल्यावर तो बाद झाला.