Vaibhav Sooryavanshi Touches Raghu’s Feet Video: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला भारताच्या वरिष्ठ संघातून लवकरच खेळायला पाहता येणार आहे. भारतीय संघाकडून खेळण्याचं वैभव सूर्यवंशीचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याच्या भारताच्या टी-२० संघात निवड करण्यात आली आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला भारताची जर्सी देण्यात आली. जर्सी पाहताना त्याची काय प्रतिक्रिया होती, याच व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
वैभव सूर्यवंशीला भारताची जर्सी देतानाच्या या क्षणाचा बीसीसीआयने एक विशेष व्हिडिओ शेअर केला आहे. यात, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य ‘रघू’ वैभवच्या रूममध्ये जाऊन त्याला त्याची जर्सी असलेला बॉक्स देतात. रघूला पाहताच वैभव हात जोडून अभिवादन करतो आणि पायाला स्पर्श करून रघूचे आपल्या खास शैलीत स्वागत करतो.
वैभव सूर्यवंशीला मिळाली भारतीय संघाची जर्सी
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये वैभव सूर्यवंशीची भारतीय संघाचा क्रिकेटपटू म्हणून पहिली मुलाखत पाहायला मिळत ाहे. या व्हिडिओमध्ये त्याला ‘टीम इंडिया’ची पहिली जर्सी मिळतानाचा आनंद आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव कसे होते हेही दिसून येत आहे. दरम्यान या व्हीडिओमध्ये या १५ वर्षीय खेळाडूचा ज्येष्ठांप्रती असलेला आदरभाव दिसून येतो; तो रघूला नमस्कार करण्यासाठी हात जोडतो आणि “राम-राम” असे म्हणत त्याचे चरणस्पर्श करतो.
भारतीय संघाची जर्सी मिळाल्यानंतर वैभवची काय प्रतिक्रिया होती?
आपल्या व्हिडिओमध्ये बोलताना वैभव सूर्यवंशी म्हणाला, “माझ्याकडे शब्दच नाहीत; जे स्वप्न पाहत मी पहिल्यांदा बॅट हातात घेतली आणि सरावासाठी क्रिकेटच्या मैदानावर गेलो, ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे. मला काय वाटतंय हे मी शब्दांत मांडू शकत नाही. माझं स्वप्न साकार झालं आहे; ते टी-शर्ट पाहून मला इतका आनंद झाला की माझ्या चेहऱ्यावरचं हसू थांबत नव्हतं. कधीकधी जेव्हा एखादी अशी गोष्ट घडते जिची आपण कल्पनाही केलेली नसते, तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही,माझ्या बाबतीत अगदी तसंच घडलं.”
वयाच्या १५ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवलेला वैभव सूर्यवंशी आता आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंड किंवा इंग्लंडच्या आगामी दौऱ्यांदरम्यान त्याने पदार्पण केल्यास, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरेल. असं केल्यास, तो महिला क्रिकेटपटू शफाली वर्मा आणि पुरुष क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडीत काढणार आहे.
