Vaibhav Sooryavanshi on His India Debut: वैभव सूर्यवंशीला इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. वैभवने या पदार्पणासह इतिहास घडवला. वैभव सूर्यवंशी हा भारताकडून पदार्पण करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आणि त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. वैभव सूर्यवंशी या सामन्यात मात्र फार मोठी खेळी करू शकला नाही आणि १४ धावा करत माघारी परतला. वैभवला भारताकडून डेब्यू कॅप मिळाल्यानंतर सर्वात आधी याबाबत कोणाला सांगितलं, याचा खुलासा त्याने केला.
वैभव सूर्यवंशीला मँचेस्टरमधील सामन्यापूर्वी तिलक वर्माने भारताची डेब्यू कॅप दिली. यावेळेस तिलक वर्मा त्याला म्हणाला, “अभिनंदन! सर्वप्रथम, तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. तुला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यामागे खूप मेहनत घेतली गेली आहे, हे तू नेहमीच सांगत आला आहेस. त्यामुळे हा क्षण तुमच्या सर्वांसाठी खूप खास आणि अभिमानास्पद आहे.”
“आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुझ्यातील प्रतिभा आणि दृढनिश्चयाच्या जोरावर तू ही कॅप मिळवली आहेस. निर्भयपणे क्रिकेट खेळ. या मोठ्या मंचावर आल्यानंतरही काहीही बदलणार नाही. योग्य मानसिकतेने खेळ आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेव. आपल्या खेळाने प्रत्येक भारतीयाचा आणि संपूर्ण देशाचा अभिमान वाढेल, अशा पद्धतीने खेळ. पुन्हा एकदा अभिनंदन! कॅप क्रमांक १२२ वैभव सूर्यवंशी ऑल द बेस्ट!,” असं तिलक वर्मा म्हणाला.
वैभव सूर्यवंशी भारताच्या पदार्पणानंतर नेमकं काय म्हणाला?
वैभव सूर्यवंशी पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर म्हणाला, “खूप छान वाटतंय. कोणीही असू दे भारतासाठी खेळायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येक जण क्रिकेट खेळायला सुरूवात करताना भारतासाठी एक दिवस खेळेन हेच स्वप्न पाहतो. त्यामुळे हा खरंच अभिमानाचा क्षण आहे. सगळ्यात आधी मी रूममध्ये जाऊन मी माझ्या वडिलांना पदार्पणाबाबत सांगितलं. ते रूममध्ये माझ्यासोबत राहत आहेत. सर्वात आधी त्यांनाच सांगितलं. इतर कोणाशी मी काहीच बोललो नाही. माझे जे सर आहेत, रोमी सर आणि माझी आई, जे कोणी माझ्यासोबत नेहमी असतात, त्या सर्वांना मी तसं सांगितलं. पण सगळ्यात आधी मी माझ्या वडिलांना सांगितलं.”
“वडिलांना ही बातमी दिल्यावर त्यांना खूप आनंद झाला. ते आनंदी होत इतकंच म्हणाले की, जे आजवर करत आला आहेस तेच करत राहायचं आहे. कसलं प्रेशर नको घेऊस फक्त स्वत:च्या गेमला बॅक कर,” असं वैभवने बीसीसीआयने शेअऱ केलेल्या व्हीडिओमध्ये सांगितलं आहे.
