Vaibhav Sooryavanshi Breaks Chris Gayle Record: आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशी वादळी फॉर्मात आहे. १५ वर्षीय स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी आपल्या बॅटने सातत्याने धुमाकूळ घालत आहे. पण पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करूनही वैभवचं अर्धशतक मात्र हुकलं. तो अर्धशतकापासून केवळ ७ धावा दूर असताना झेलबाद झाला. पण तरीही वैभवने आयपीएलमध्ये एक नवीन इतिहास घडवला. ख्रिस गेलला मागे टाकत त्याने पहिलं स्थान गाठलं आहे.
न्यू चंदीगड येथे पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात वैभवने पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने पॉवरप्लेमध्ये चौकार-षटकारांची आतिषबाजी करत एक मोठी कामगिरी केली. यासह त्याने ऑरेंज कॅप पटकावली असून त्याने ४०० धावांचा पल्ला पार केला.
वैभव सूर्यवंशीने घडवला इतिहास
राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात करताना सूर्यवंशीने अवघ्या १६ चेंडूंमध्ये ४३ धावा ठोकल्या. या स्फोटक खेळीदरम्यान त्याने पाच षटकार आणि तीन चौकार लगावले. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि मार्को यानसेन यांसारख्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. या ४३ धावांच्या खेळीदरम्यान सूर्यवंशीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. त्याने या हंगामात ४०० धावा पूर्ण केल्या. वैभव एकाच आयपीएल हंगामात सर्वात कमी चेंडूंमध्ये ४०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने आंद्रे रसेलचा सात वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वात कमी चेंडूंमध्ये ४०० धावा करणारे खेळाडू
१६७ – वैभव सूर्यवंशी (२०२६)
१८८ – आंद्रे रसेल (२०१९)
१९५ – अभिषेक शर्मा (२०२४)
१९७ – निकोलस पूरन (२०२५)
२०० – ग्लेन मॅक्सवेल (२०१४)
२२३ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सूर्यवंशीने राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात १५ धावा कुटल्या, त्यानंतर लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर १७ धावा केल्या. राजस्थानने अवघ्या ३.१ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या. मात्र, एका फुलटॉस चेंडूवर मिड-ऑफला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरकडे झेल देऊन तो ४३ धावांवर बाद झाला. पण यानंतर यशस्वी जैस्वालने अर्धशतक शतक झळकावत संघाच्या धावांचा वेग कायम ठेवला. त्यानंतर शुभम दुबे व डोनावन फरेरा यांनी ७७ धावांची भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने ४ बाद २२२ अशी मोठी धावसंख्या उभारली. यात मार्कस स्टॉयनिसने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या २२ चेंडूंमध्ये सहा षटकार आणि चार चौकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. पण, प्रभसिमरन सिंग (५९), प्रियांश आर्य (२९) आणि कूपर कॉनोली (३०) यांचा समावेश असलेल्या पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यांना त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. अखेरीस स्टॉयनिसने संघाला २२२ धावांपर्यंत पोहोचवलं. प्रत्युत्तरात, राजस्थानने १९.२ षटकांत २२३ धावांचे लक्ष्य पूर्ण केलं.
