Vaibhav Sooryavashi 10th Board Exam: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि गुगल सर्चवर एकच नाव तुफान चर्चेत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही धावांचा पाऊस पाडला. काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेत आयसीी अंडर- १९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी राहिला. स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना १७५ धावांची वादळी खेळी केली. ही स्पर्धा झाल्यानंतर तो भारतात परतला आहे. सध्या १० वी बोर्डाची परिक्षा सुरू आहे. वैभव सूर्यवंशीच्या हॉल तिकीटचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पण तो ही परीक्षा देणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

वैभव सूर्यवंशी CBSE बोर्डाचा विद्यार्थी आहे. CBSE बोर्डाची परिक्षा १७ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत होणार आहे. पण यावेळी तो ही परीक्षा देणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कारण येत्या काही दिवसात आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तो या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. त्यामुळे तो सध्या आयपीएलच्या क्रिकेट कॅम्पमध्ये व्यस्त आहे. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो बोर्डाची परीक्षा देण्याची शक्यता खूप कमी आहे.

वैभव सूर्यवंशी हाक मॉडेस्टी शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेचे संचालक आदर्श कुमार पिंटू म्हणाले, वैभव सूर्यवंशीचा परीक्षेचा फॉर्म भरला गेला असून हॉल तिकीट देखील आलं आहे. पोद्दार आंतरराष्ट्रीय शाळा हे त्याचं परीक्षा केंद्र आहे. पण त्याच्या वडिलांनी दिलेल्य माहितीनुसार, वैभव यावर्षी परीक्षा देऊ शकणार नाही. तो पुढील वर्षी बोर्डाची परीक्षा देईल, असे त्याच्या वडिलांनी स्पष्ट केले. वैभवच्या वडिलांनी असं देखील सांगितलं आहे की, यावेळी तो केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे.

भारताच्या वर्ल्डकप विजयात वैभव सूर्यवंशीचा मोलाचा वाटा

झिम्बाब्वे आणि नामिबियात झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला. यावेळी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली होती. भारतीय संघाने स्पर्धेच्या सुरूवातीपासून ते फायनलपर्यंत एकही सामना गमावला नव्हता. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी दुसऱ्या स्थानी राहिला. पण त्याची स्पर्धेतील एकूण कामगिरी पाहता, त्याची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून करण्यात आली.