Vaibhav Sooryavanshi Fifty Celebration Meaning: वैभव सूर्यवंशीच्या ९३ धावांच्या खेळीच्या बळावर राजस्थानने लखनौवर ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह राजस्थानचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला असून अखेरचा सामना जिंकल्यास संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. दरम्यान वैभव सूर्यवंशीने त्याच्या अर्धशतकी खेळीनंतर केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं. पण या सेलिब्रेशनमागचा नेमका अर्थ काय आहे, ते जाणून घेऊया.

वैभव सूर्यवंशीने लखनौविरूद्ध सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला. वैभवने ३८ चेंडूत ७ चौकार व तब्बल १० षटकारांसह ९३ धावांची खेळी साकारली. यासह त्याने ध्रुव जुरेलसह १०५ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. तत्पूर्वी वैभवने या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने हाताने A अक्षर तयार करत सेलिब्रेशन केलं. त्याच्या या सेलिब्रेशनचा अर्थ सगळे शोधत असताना सामनावीर पुरस्कारानंतर त्याने याचा खुलासा केला.

वैभव सूर्यवंशीला या मॅचविनिंग खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर तिसऱ्यांदा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकल्यानंतर कसं वाटतंय, या प्रश्नाचं उत्तर देताना वैभव म्हणाला, “काही विशेष नाही. गोलंदाजी सुरू असताना मी बाहेर बसलो होतो आणि खेळपट्टी चांगली दिसत होती. त्यामुळे सुरुवातीलाच घाई न करता थोडा वेळ घ्यावा आणि जास्त वेळ फलंदाजी केली तर दुसऱ्या टोकाच्या फलंदाजालाही त्याचा फायदा होईल, असा विचार मी केला होता.”

:माझा दृष्टिकोन हाच होता. मला माहित आहे की मी कधीही दोन-तीन चौकार किंवा षटकार मारू शकतो. त्यामुळे थोडा वेळ घेण्यात काहीच अडचण नव्हती. घाई न करता सामना शेवटपर्यंत नेण्यावर माझं लक्ष होतं,” असं तो पुढे म्हणाला.

लहान वयात मिळणाऱ्या प्रसिद्धी आणि कौतुकाबद्दल विचारल्यानंतर सूर्यवंशीने सांगितलं, “त्याबद्दल मी फार विचार करत नाही. मी फारसं काही पाहत नाही, वर्तमानपत्रही वाचत नाही. त्यामुळे या गोष्टी डोक्यात ठेवत नाही. मला वाटतं ही फक्त सुरुवात आहे. माझं करिअर मोठं झालं आणि मी बराच काळ खेळलो, तर लोक अजून खूप काही बोलतील. पण माझं लक्ष फक्त खेळावर आणि माझा प्रवास पूर्ण करण्यावर असायला हवं.”

वैभव सूर्यवंशीच्या A सेलिब्रेशनमागचा अर्थ काय?

अर्धशतकाच्या सेलिब्रेशनबद्दल वैभव म्हणाला, “सर, मला स्वतःलाच माहिती नाही. मी प्रत्येक सामन्यात काहीतरी नवीन करतो. त्यामागे काही खास अर्थ नसतो. मागच्या सामन्यात जे सेलिब्रेशन केलं होतं, त्यालाही काही अर्थ नव्हता. फक्त नवीन गोष्टी ट्राय करत असतो.”

राजस्थान रॉयल्सला आता प्लेऑफसाठीचा सर्वात महत्त्वाचा सामना मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळायचा आहे. हा सामना रविवारी २४ मे रोजी मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.