Vaibhav Sooryavanshi Instagram Post: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील २ सामने जिंकून आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मालिकेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे चौथ्या सामन्याआधी एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणार का?
चौथ्या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीची पोस्ट
वैभव सूर्यवंशी आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल जातो. झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. पण वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान वैभवने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असल्याचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या पोस्टला कॅप्शन देत त्याने, ‘Stay Seated’ असे लिहिले आहे . या पोस्टवर त्याने सिद्धू मुसेवालाचं गाणं देखील अॅड केलं आहे.
मालिकेतील चौथा सामना भारतीय संघासाठी मालिका जिंकण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यातही संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात उतरू शकते. पण भारतीय संघाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरच्या मते, वैभवला मालिकेतील पाचव्या सामन्यात संधी मिळायला हवी. सुरूवातीच्या ३ सामन्यांमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. आता चौथ्या आणि पाचव्या सामन्यात त्याला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारतीय संघ २-१ ने आघाडीवर
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने २५० धावांचा पाठलाग करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत आली होती. त्यानंतर झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धावांचा यशस्वी बचाव केला आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. सध्या भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. चौथा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
