Vaibhav Suryavanshi Duleep Trophy bowling wickets BCCI viral video: आपल्या स्फोटक फलंदाजीने आणि धावांचा पाऊस पाडत विक्रमांची रांग लावणाऱ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आता गोलंदाजीतील आपली चमक दाखवून दिली आहे. वैभव सूर्यवंशी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला, पण स्वस्तात बाद होत माघारी परतला. वैभव फलंदाजीत फेल झाला असला तरी गोलंदाजीत त्याने दणका उडवला. त्याने केवळ चार चेंडूंमध्ये दोन बळी घेत एक जबरदस्त स्पेल टाकला आणि खळबळ उडवून दिली.
सध्या सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी सामन्यात वैभव सूर्यवंशीने ही भेदक गोलंदाजी केली. फलंदाजीतील खराब कामगिरीनंतरही, वैभव सूर्यवंशीचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे. वैभव सूर्यवंशीने दोन विकेट्स घेतल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
दुलीप ट्रॉफीला सुरुवात झाली असून, यात ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोनच्या संघांमधील सामना रंगला आहे. ईस्ट झोनच्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली. वैभवकडून नेहमीप्रमाणे स्फोटक खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याने सर्वांनाच निराश केलं. सहा चेंडूंमध्ये ८ धावा करत वैभव स्वस्तात बाद झाला. त्याने या आठ धावा केवळ दोन चौकारांच्या मदतीने केल्या. तरीही ईस्ट झोनच्या संघाने ४६७ धावांची प्रचंड धावसंख्या उभारली. सुदीप कुमारने १४६ धावांची शानदार खेळी केली, तर शाहबाज अहमदनेही १६७ धावांची धडाकेबाज खेळी केली.
नॉर्थ-ईस्ट झोनचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्या डावात त्यांना केवळ १११ धावा करता आल्या आणि परिणामी त्यांना ‘फॉलो-ऑन’चा सामना करावा लागला. दुसऱ्या डावातही संघ संघर्ष करत आहे. दरम्यान, कर्णधार इशान किशनने वैभवच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याने सलग चार चेंडूंमध्ये दोन बळी टिपले. वैभवने किशन लिंगडोह आणि इमलीवती लेमटूर यांना बाद केलं; त्याने तीन षटकांत ११ धावा देत २ बळी मिळवले.
दरम्यान, ‘ईस्ट झोन’चा या उपांत्यपूर्व सामन्यातील विजय जवळपास निश्चित मानला जात आहे; या विजयामुळे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. याचा अर्थ असा की, जरी या सामन्याच्या दुसऱ्या डावात वैभवला फलंदाजीची संधी मिळण्याची शक्यता कमी असली, तरी उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे त्यांना आणखी एक संधी मिळेल आणि तिथे त्याला उत्कृष्ट फलंदाजी करून दाखवावी लागेल. फलंदाजी ही वैभवची खरी ताकद आहे आणि त्यात त्याला सुधारणा करण्याची गरज आहे. दरम्यान गोलंदाजीत त्याने दिलेलं योगदान भविष्यात त्याला भारतासाठी खेळताना मदत करणारं ठरेल.
