Vaibhav Sooryavanshi gesture win hearts Video: वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप एलिमिनेटर सामन्यात पाहायला मिळालं. आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्सचे आमनेसामने आहेत. वैभव सूर्यवंशाने या सामन्यात २९ चेंडूत ५ चौकार व तब्बल १२ षटकारांच्या मदतीने ९७ धावांची वादळी खेळी केली. पण त्याचं विक्रमी शतक मात्र ३ धावांनी हुकलं. यादरम्यान वैभवचा सामन्यापूर्वीचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्याने सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

वैभव सूर्यवंशीच्या ९७ धावांच्या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने वादळी सुरूवात केली. ध्रुव जुरेलने अर्धशतक करत तर रियान पराग व यशस्वीने काही धावांचं योगदान दिलं, यासह संघ फक्त २४३ धावा करण्यात यशस्वी ठरला. सनरायझर्स हैदराबादने अखेरच्या षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी करत राजस्थानला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.

वैभव सूर्यवंशीने या सामन्यात ३३३.४८ च्या स्ट्राईक रेटने ९७ धावांची वादळी खेळी केली. मात्र, प्रफुल्ल हिंगेने त्याला बाद केलं आणि त्याचे तिसरं आयपीएल शतक हुकले. सामन्यापूर्वी संघ जेव्हा सराव करत होता, तेव्हाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डावापूर्वी वैभवने महान सुनील गावस्कर यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वैभव सराव करत असताना त्याने या दिग्गज खेळाडूंना पाहून धावत आला.

वैभव सूर्यवंशीच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं

वैभव सूर्यवंशी सुनील गावस्कर, संजय बांगर आणि समालोचक जतीन सप्रू यांना पाहताच त्यांच्याकडे धावत गेला आणि सरळ त्याने या तिघांचा आशीर्वाद घेतला. जतिनच्या पाया पडताच जतिन लगेच मागे झाला आणि त्याला सावरत मिठी मारली. वैभव सूर्यवंशीच्या या व्हीडिओवरून त्याच्यावरील संस्कारांचं आणि या कृतीचं कौतुक केलं जात आहे.

वैभव सूर्यवंशी हा एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला, त्याने ६८० धावा केल्या आहेत. त्याने एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. त्याने ६१ षटकार मारून २०१२ मध्ये ख्रिस गेलने केलेल्या ५९ षटकारांचा विक्रम मोडला. इतकेच नव्हे तर, वैभवने अवघ्या १६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि प्लेऑफ सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा खेळाडू म्हणून सुरेश रैनाच्या पंक्तीत स्थान मिळवले.