Vaibhav Sooryavanshi Biggest Dream in T20: वैभव सूर्यवंशी आयपीएलमधील प्रत्येक सामन्यात एकामागून एक विक्रम आपल्या नावे करत आहे. त्याने फार कमी वयात आपल्या कौशल्याच्या जोरावर क्रिकेट जगतात आपलं नाव कमावलं आहे. आता आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी ख्रिस गेलचा सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम मोडणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यादरम्यान प्लेऑफपूर्वीच्या पीटरसनबरोबरच्या एका शो मध्ये वैभव सूर्यवंशीने टी-२०मधील आपलं मोठं स्वप्न कोणतं आहे, हे सांगितलंय.
वैभव सूर्यवंशी अवघा १५ वर्षांचा असला, तरी राजस्थान रॉयल्सचा हा युवा फलंदाज मोठी स्वप्न पाहत आहे. बहुतांश युवा फलंदाज अर्धशतक किंवा शतक झळकावण्याचं स्वप्न पाहतात, पण वैभवचं लक्ष्य त्याहून खूप मोठं आहे. टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज बनण्याचं त्याचं स्वप्न आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनसोबत त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील संवादात वैभवने ही इच्छा व्यक्त केली. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याच्याकडे पुन्हा सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. वय लहान असलं तरी वैभवचा आत्मविश्वास, निर्भीड विचारसरणी आणि मोठं लक्ष्य ठेवण्याची वृत्ती यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरत आहे.
काय आहे वैभव सूर्यवंशीचं मोठं स्वप्न?
वैभव तुला अर्धशतकी खेळी झाल्यानंतर सेलिब्रेशन करायला आवडतं का, यावर तो म्हणाला, “नाही, तितकंसं नाही,” असं हसत उत्तर दिलं. यानंतर चर्चा त्याच्या महत्त्वाकांक्षेकडे वळली आणि वैभवने स्पष्ट केलं की, पारंपरिक विक्रम किंवा टप्पे त्याला फारसे आकर्षित करत नाहीत. “मला टी-२० क्रिकेटमध्ये २०० धावा करायच्या आहेत. मला त्यांचा विक्रम मोडून २०० धावा करायच्या आहेत,” असं वैभव म्हणाला. तो ख्रिस गेलच्या ऐतिहासिक विक्रमाबद्दल बोलत होता.
आयपीएल २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध ख्रिस गेलने केलेल्या नाबाद १७५ धावा आजही टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही व्यावसायिक टी-२० क्रिकेटमध्ये अद्याप कोणालाही २०० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. बहुतांश खेळाडूंसाठी असं लक्ष्य अवास्तव किंवा खूप धाडसी वाटू शकतं. मात्र, वैभव सूर्यवंशीसाठी हा आत्मविश्वास अगदी नैसर्गिक असल्याचं दिसून येतं.
पीटरसनशी बोलताना ही २०० धावांची खेळी तो कधी साकारणार हेही त्याने सांगतिलं, “मी कोणत्याही सामन्यात पूर्ण २० षटकं फलंदाजी केली, तर १७५ धावांचा तो विक्रम मोडू शकतो,” असं तो आत्मविश्वासाने म्हणाला.
