आयपीएलचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला आहे. जवळपास दोन महिन्यांच्या देशभर सफरीनंतर दहापैकी चार संघ शर्यतीत उरले आहेत. दोन महिन्यांच्या प्रवासाची ही क्षणचित्रं
वैभव सूर्यवंशीला विकेट मेडन; मोहसीन खानची कमाल
झंझावाती फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीला लखनौ सुपरजायंट्सच्या मोहसीन खानने विकेट मेडन टाकली. १५वर्षीय वैभव भल्याभल्या गोलंदाजांना षटकार चोपत असताना मोहसीनने अफलातून ओव्हर टाकली. २२ एप्रिलला लखनौतल्या एकाना स्टेडियमवर झालेल्या लढतीत मोहसीनने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य केली. बेसबॉल स्टाईल फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघांना निरुत्तर करणाऱ्या वैभवला मोहसीनने पाच चेंडू रोखलं. सहाव्या चेंडूवर तो बाद झाला.
चिठ्ठी सेलिब्रेशन
शतक झाल्यानंतर खिशातून चिठ्ठी काढत संदेश देण्याचं सेलिब्रेशन यंदा ट्रेंन्डिंग गोष्ट ठरली. चेन्नईसाठी वेगवान अर्धशतक झळकावणारा उर्विल पटेल, महत्प्रयासाने आयपीएलपर्यंत पोहोचलेला रघू शर्मा, लखनौतर्फे खेळायची संधी मिळालेला आकाश सिंग यांनी खिशातून चिठ्ठी काढून तो क्षण साजरा केला. सनरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्माने चिठ्ठी सेलिब्रेशन सुरू केलं. माजी खेळाडूंनी यावर टीका करत आयपीएल प्रशासनाने यावर बंदी घालावी अशी मागणी केली.
कृणाल पंड्याचा बाऊन्सर
वेगवान गोलंदाज बाऊन्सर टाकतात. यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फिरकीपटू कृणाल पंड्याच्या बाऊन्सरने प्रतिस्पर्धी संघांना चकित केलं. फलंदाज बुकलून काढत असल्यामुळे त्यांना रोखायचं कसं हा यक्षप्रश्न गोलंदाजांसमोर होता. याच विचारातून कृणालने भात्यातून बाऊन्सर बाहेर काढला. त्याच्या बाऊन्सरने अनेक फलंदाज चकित झाले. स्टंप्सपाठी जितेश शर्माने चोख काम करत बाऊन्सर अडवलेही.
११ वर्षांनी शतकी भाग्य
कर्णधारपदाच्या बाबतीत मिडास टच असलेल्या श्रेयस अय्यरने यंदा आयपीएल स्पर्धेतलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. करो या मरो लढतीत श्रेयसने लखनौविरुद्ध शतकी खेळी साकारली. या खेळीचं आणखी एक महत्त्व आहे. श्रेयसने २०१५ साली आयपीएल पदार्पण केलं. तब्बल ११ वर्षानंतर श्रेयसने शतकाला गवसणी घातली.
धोनी होता नव्हता?
४४वर्षीय महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा आजही चेहरा आहे. धोनीच्याच नेतृत्वात चेन्नईने पाच जेतेपदं पटकावली आहेत. यंदाच्या हंगामात धोनी खेळणार का याविषयी साशंकता होती मात्र धोनी खेळणार असल्याचं संघव्यवस्थपानाने स्पष्ट केलं. मात्र स्पर्धेच्या एक दिवस आधी पायाला झालेल्या दुखापतीमुळे धोनी पूर्वार्धात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. चेन्नईचा संघ सुरुवातीला चाचपडत होता. त्यानंतर त्यांना लय गवसली. चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत असताना धोनी खेळणार असं वाटलं होतं. मात्र तो खेळला नाही. संघाचा भाग असतानाही धोनीने संघाबाहेर प्रवास करणंही टाळलं. चेन्नईतली लढत धोनीची शेवटची असेल अशी वातावरण निर्मिती झाली होती. मात्र अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे धोनी खेळू शकणार नाही असं कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्पष्ट केलं. धोनीने सहकाऱ्यांबरोबर मैदानाला फेरी मारली. मात्र निवृत्तीची घोषणा केली नाही. धोनी या हंगामात खरंच चेन्नईचा भाग होता का असं संदिग्ध विस्कळीत चित्र दिसलं.
पंतने दिली ऑन कॅमेरा शिवी
संपूर्ण हंगामात स्वत:ची कामगिरी यथातथा आणि संघाची कामगिरी सर्वसाधारण राहिलेल्या ऋषभ पंतचा संयम सुटला. समालोचक इयन बिशप यांच्याबरोबर बातचीत करत असताना ऋषभ पंतने इंग्रजी फकारान्त शिवी दिली. ऑन कॅमेरा बोलताना काही संकेतांचे, शिष्टाचाराचं पालन केलं जातं. याचा ऋषभला विसर पडला. बिशप यांनी तात्काळ माफी मागितली. सोशल मीडियावर ऋषभच्या या बेताल वागण्याची चर्चा झाली. या शिवीसाठी ऋषभवर कोणतीही कारवाई झाली नाही.
विदर्भवीर प्रफुल हिंगेची स्वप्नवत सुरुवात
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये विदर्भासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या प्रफुल हिंगेने स्वप्नवत असं आयपीएल पदार्पण केलं. हैदराबाद इथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना हिंगेने पहिल्याच ओव्हरमध्ये ३ विकेट्स पटकावण्याची करामत केली. आयपीएल इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. प्रफुलने वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि ल्युहान डी प्रिटोरस यांना बाद करत राजस्थानच्या डावाला खिंडार पाडलं.
कॉँकशन सबचा वाद
डोक्याला, मानेला गंभीर दुखापत होऊन चक्कर, अंधारी किंवा अस्वस्थ वाटत असेल तर संबंधित खेळाडूला वगळून काँकशन सबस्टिट्यूट घेता येतो. मात्र यंदाच्या हंगामात काँकशन सबच्या निमित्ताने वाद पाहायला मिळाला. झेल पकडताना सँटनरच्या खांद्याला दुखापत झाली होती. मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने काँकशन सबसाठी विचारणा केली. सामनाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य केली. इम्पॅक्ट प्लेयरच्या बरोबरीने काँकशन सबही मैदानात आल्याने चाहते चक्रावले. सामना संपल्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी यासंदर्भात माहिती दिली. सँटनरच्या खांद्याला दुखापत झाली. मात्र मानेला तसंच डोक्यालाही लागलं होतं. त्याला चक्करेसारखा त्रास जाणवला. त्यामुळे काँकशन सबची मागणी केली असं जयवर्धने यांनी सांगितलं. कोलकाता नाईट रायडर्सचा विकेटकीपर बॅट्समन अंगक्रिश रघुवंशीची झेल घेताना वरुण चक्रवर्तीशी टक्कर झाली. त्यालाही चक्करेसारखा त्रास जाणवू लागल्याने काँकशन सब घेण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स संघव्यवस्थापनाने सोशल मीडिया हँडल्सवर रमणदीप सिंग काँकशन सबस्टिट्यूट संघात समाविष्ट करण्यात आल्याचं सांगितलं. मात्र फलंदाजीच्या वेळी तेजस्वी दहिया काँकशन सबस्टिट्यूट असल्याचं स्पष्ट झालं.
राजस्थानचा कर्णधार वेपिंग करताना
लाईव्ह सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंगरुममध्ये वेपिंग अर्थात ई सिगारेट ओढताना दिसला. भारतात ई सिगारेट्सवर बंदी आहे. आयपीएल नियमांनुसारही, असं काही करणं नियमांचं उल्लंघन करणारं आहे. रियानला गंभीर शिक्षा होईल असं वाटलं होतं मात्र आयपीएल प्रशासनाने २५ टक्के दंड ठोठावून प्रकरण बंद केलं. त्यानंतर पंजाब किंग्ज संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल वेपिंग करताना आढळला होता.
हनी ट्रॅप, डगआऊट-बसमध्ये बेकायदेशीर माणसं
यंदाच्या हंगामात आयपीएल प्रशासनाने खेळाडू आणि संघव्यवस्थापकांकरता नियमावली जारी केली. हनी ट्रॅपसारखे प्रकार घडू शकतात, खेळाडूंनी काळजी घ्यावी. डगआऊट, ड्रेसिंगरुम तसंच टीम बस याठिकाणी वैध परवानगी असलेल्या लोकांनाच प्रवेश असेल हे स्पष्ट करण्यात आलं. डगआऊट तसंच टीम बसमध्ये संघाचा भाग नसलेले लोक दिसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं होतं. भ्रष्टाचार तसंच ड्रग्ज यांना कोणतंही स्थान नाही त्यामुळे संघव्यवस्थापनांनी आत्यंतिक काळजी घ्यावी असे आयपीएल प्रशासनाने स्पष्ट केलं. राजस्थान रॉयल्सचे .. रोमी भिंडर सामन्यादरम्यान मोबाईल फोन वापरताना दिसले होते.
अर्शदीपची आक्षेपार्ह टिप्पणी
अर्शदीप सिंगचे व्लॉग यंदाच्या हंगामाच चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अर्शदीपने टी२० वर्ल्डकप काळात युट्यूब चॅनल सुरू केलं. व्लॉगिंग करतो. हलक्याफुलक्या पद्धतीचं कंटेट सादर करतो. धरमशाळेत पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओत तिलक वर्माला ‘ओये अंधेरे’ म्हटल्याने नवा वाद पेटला आहे. अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दोघेही भारतीय संघाकडून एकत्र खेळतात. पण असं असूनही तिलक वर्मावर वर्णभेदी टीका करणं हे क्रिकेट चाहत्यांना मुळीच आवडलं नाही.
१९व्या हंगामात ३६व्या वर्षी मनीष पांडेचा अफलातून झेल
आयपीएलचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये मनीष पांडेचा समावेश होतो. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मनीष पांडेने टीम डेव्हिडचा अचंबित करणारा झेल टिपला. तो झेल पाहून विराट कोहली, टीम डेव्हिड यांच्यासह कोलकाता संघातील सहकारीही अवाक झाले. ३६व्या वर्षी फिटनेस जपून मनीषने घेतलेला तो झेल यंदाच्याच नव्हे आयपीएलमधल्या सर्वोत्तम झेलपैकी एक ठरणारा आहे.
पृथ्वी शॉ याला एकाही सामन्यात संधी नाही
दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगली सुरुवात केली मात्र त्यानंतर त्यांची लय हरपली. कामगिरी ढिसाळ होत गेल्याने प्लेऑफ्सच्या त्यांच्या आशा मावळत गेल्या. दिल्लीने ताफ्यातील २२ खेळाडूंना संधी दिली पण धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ याला एकाही सामन्यात संधी दिली नाही
