Vaibhav Sooryavanshi Wimbledon 2026 viral statement: वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो विंबल्डन २०२६ च्या अंतिम फेरीसाठी गेला होता. येथे त्याने परिधान केलेल्या फॉर्मल कपड्यांचीच जास्त चर्चा झाली. अभिषेक शर्मा आणि युवराज सिंग यांच्याबरोबर वैभव सूर्यवंशी तिथे गेला होता.

१५ वर्षांच्या या खेळाडूने त्याच्या नेहमीच्या निष्पाप शैलीत कोर्ट-साइड मुलाखतीत सांगितलं की, या सूटच्या निवडीसाठी कोणतंही नियोजन केलं नव्हतं आणि अभिषेक शर्माने शेवटच्या क्षणी ही व्यवस्था केली होती. सूर्यवंशी आणि अभिषेक हे भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगबरोबर जेनिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांचा सामना पाहायला गेले होते. यावेळी वैभवने काळ्या रंगाचा सूट, पट्टेरी (striped) टाय आणि स्टायलिश-रिमलेस आयताकृती चष्मा घातला होता. सूर्यवंशी आणि अभिषेक नुकतेच इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळून आले आहेत, ज्यामध्ये भारताचा ४-० असा पराभव झाला.

“मी कपड्यांसाठी काही खास केलं नाही. पण घाईघाईत जे मिळालं ते मी अभिषेक भाईला सांगून अरेंज करून घेतलं आणि घालून आलो”, असं वैभव सूर्यवंशीने त्याच्या कपड्यांबद्दल सांगितलं. या खेळाडूने सांगितलं की त्याला टेनिसची समज आहे आणि तो आपल्या बालपणापासून हा खेळ पाहत आहे.

तो म्हणाला, “मी गेल्या चार ते पाच वर्षांपासून टेनिस फॉलो करत आहे. मी (राफेल) नदाल आणि (नोव्हाक) जोकोविचचे सामने पाहायचो. मला अजूनही जोकोविच खूप आवडतो. माझ्यासाठी अल्काराझ सर्वात प्रभावी होता. तो या स्पर्धेत नाहीये, पण मी जे काही फॉलो केलंय त्यानुसार सिनर सर्वोत्तम दिसतोय, ज्या प्रकारे त्याने वर्चस्व गाजवलं आहे, आशा आहे की आज तोच जिंकेल.”

वैभव सूर्यवंशीची त्याचा आदर्श युवराज सिंगशी भेट

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सूर्यवंशीने सांगितलं की, युवराज सिंग हा देखील लहानाचा मोठा होताना त्याचा एक आदर्श होता आणि त्याला भेटणं ही त्याच्यासाठी शिकण्याची एक मोठी संधी होती. सूर्यवंशी म्हणाला, “तो माझ्या आदर्शांपैकी एक आहे, त्यामुळे त्याला पहिल्यांदा भेटून खूप छान वाटलं. मी त्याच्याशी खूप गप्पा मारल्या आणि त्याने मला खूप सल्ला दिला. त्याच्याकडून इतकं काही शिकायला मिळणं खूप चांगलं वाटतं.”